गॅस सिलिंडरचे रीफिलिंग करणाऱ्या भामट्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 11:40 PM2021-02-19T23:40:32+5:302021-02-19T23:42:25+5:30

Refilling gas cylinders caseअत्यंत धोकादायक पद्धतीने सिलिंडरमधून गॅस काढून ती दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरणाऱ्या दोन भामट्यांना बेलतरोडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

Caught scoundrels refilling gas cylinders | गॅस सिलिंडरचे रीफिलिंग करणाऱ्या भामट्यांना पकडले

गॅस सिलिंडरचे रीफिलिंग करणाऱ्या भामट्यांना पकडले

Next
ठळक मुद्दे२८ सिलिंडर सापडले - वाहनासह २ लाख, १७ हजारांचा ऐवज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - अत्यंत धोकादायक पद्धतीने सिलिंडरमधून गॅस काढून ती दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरणाऱ्या दोन भामट्यांना बेलतरोडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. रामनिवास उर्फ रमेश सुखराम बिष्णोई (वय २४) आणि श्रवण सुखराम बिष्णोई (वय २५) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण २८ सिलिंडर आणि वाहनांसह २ लाख १७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आरोपी बिष्णोई बंधू हुडकेश्वरमधील भवानी सभागृहाच्या मागे राधाकृष्णनगरात राहतात. बेलतरोडीत ते एका सार्वजनिक ठिकाणी भरलेल्या सिलिंडरमधून गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरत असल्याची माहिती बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांना मिळाली. त्यावरून आकोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बेलतरोडीतील बालाजी मंदिराजवळ गुरुवारी दुपारी छापा घातला. तेथे आरोपी सिलिंडरमधून गॅस काढून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी २८ सिलिंडर, एक मालवाहू ऑटो, रोख ४५९० रुपये आणि वजनकाटा असा एकूण २ लाख, १७ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ.अक्षय शिंदे, अजनीचे सहायक आयुक्त नलावडे, ठाणेदार विजय आकोत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विकास मनपिया, हवलदार तेजराम देवळे, रणधीर दीक्षित, विजय श्रीवास, नायक अरविंद टेंभरे, गोपाल देशमुख, बजरंग जुनघरे, नितीन बावणे, प्रशांत सोनुलकर, अविनाश डोमकुंडवार, कुणाल लांडगे आदींनी ही कामगिरी बजावली.

अत्यंत घातक प्रकार

सिलींडरमधून गॅस बाहेर काढताना चुकून त्यावेळी आजुबाजुला स्पार्क झाले किंवा कुणी विडी, सिगारेट पिणारा तेथून गेल्यास आगीचा मोठा भडका उडू शकतो. नंतर सिलींडरचे स्फोट होऊ शकतात. सार्वजिनक ठिकाणी आरोपी बिष्णोई बंधू हा धोकादायक प्रकार करीत होते. त्यामुळे त्यांनी स्वताचाच नव्हे तर आजुबाजुच्यांचाही जीव धोक्यात आणला होता. वेळीच पोलिसांनी कारवाई करून मोठा धोका टाळला.

वजन करून घ्या किंवा तक्रार द्या

सिलींडर घरोघरी पुरविणारांना हाताशी धरून काही जण त्यातील गॅस कमी करतात. ती गॅस दुसऱ्या सिलींडरमध्ये भरतात. असे करताना ही मंडळी ग्राहकांची फसवणूक करतानाच त्यांच्या जिविताशीही खेळण्याचा प्रयत्न करतात. यातून सिलींडरमधून गॅस गळतीचा धोका वाढतो. त्यामुळे ग्राहकांनी सतर्कता बाळगावी. सिलींडर घेताना त्याचे वजन करून घ्यावे. संशय आल्यास लगेच पोलिसांना तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Caught scoundrels refilling gas cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.