नागपूर : सीबीआयने शनिवारी २४ सप्टेंबरला चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात नागपूरसह देशभरात ५६ ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. नागपुरातील कामठीत या बाबत शोध मोहिम राबविण्यात आली. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरून मोबाईल, लॅपटॉप आणि इतर उपकरणे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
दिल्लीच्या सीबीआय मुख्यालयातील पथकाने कामठीत एका ठिकाणी सर्च वॉरंट जारी केला होता. त्यानंतर नागपूर सीबीआयच्या मदतीने धाड टाकली. याबाबत स्थानिक सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. याबाबत सीबीआयमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रेन (इंटरपोल) सिंगापुर शाखेने सीबीआयला याबाबत सुचना दिली होती. अनेक भारतीय नागरिकांच्या क्लाऊड स्टोरेजचा वापर करून बाल लैंगिक शोषण साहित्याचे (पोर्न) संचालन, डाऊनलोडींग, ट्रान्समिशन केल्याचा आरोप करण्यात आला होता. या मोहिमेत ५० पेक्षा अधिक संशयीतांचे मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करण्यात आली. यात अनेकांच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी आढळल्याची माहिती आहे. कामठीत धाड टाकण्यात आल्याची स्थानिक सीबीआयच्या सुत्रांनी पुष्टी केली आहे.
...............