लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑनलाईन शिक्षण आणि शाळांच्या शुल्काशी संबंधित विषयावरून सीबीएसई संबंधित संघटना अनएडेड स्कूल वेलफेअर असोसिएशनने राज्य सरकार व शिक्षण विभागाच्या विरोधात मोहीम उभारली आहे. अधिकच त्रास वाढला तर नाईलाजाने शिकविणे बंद करावे लागेल, असा इशारा संघटनेने दिला.
असोसिएशनने सरकारी व अनुदानित शाळांमध्ये असलेल्या स्थितीचा मुद्दा पुढे केला आहे. या शाळांमधील शिक्षण पूर्णत: ठप्प आहे. सरकार आणि शिक्षण विभाग त्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याऐवजी खासगी सीबीएसई शाळांवर बेकायदेशीरपणे दबाव टाकत आहे. असोसिएशनच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना काही पालकच राजकारण करीत असल्याचा आरोप केला. सरकार व शिक्षण विभाग सीबीएसई शाळांच्या आर्थिक अडचणीकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत आहेत. सरकारने शाळांना शुल्क घेण्यासंदर्भात सांगितलेले नाही. कोरोनामुळे शुल्क न घेण्याचे व विलंब शुल्क न लावण्यासाठी सांगितले होते. शाळा सरकारच्या या आदेशांचे कडक पालन करीत आहेत. काही पालक शाळांविरोधात तक्रारी करून अन्य पालकांना भडकावत आहेत.
शाळांकडे पैसा नसताना ते शिक्षकांना पगार कसा देणार, असेही ते म्हणाले. शाळा इमारतीची देखभाल व दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. पाणी, विजेच्या बिलांचे भुगतान कसे करावे, हा प्रश्न आहे. या समस्या सुटल्या नाहीत तर नाईलाजाने शिक्षण बंद करावे लागणार आहे. पालकांना तसे पत्र लिहून विनंतीही करण्यात आलेली आहे.