सुकामेवा खाऊन साजरी करा दिवाळी : किमतीत २५ टक्क्यांपर्यंत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 09:35 PM2020-10-30T21:35:51+5:302020-10-30T21:37:47+5:30
Diwali, dried fruits, prices declined, Napur News दिवाळीपूर्वी सुकामेव्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून त्याचा फायदा खरेदीदारांना मिळत आहे. त्यामुळे काजू, बदाम, पिश्ता, आक्रोड यांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीपूर्वी सुकामेव्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून त्याचा फायदा खरेदीदारांना मिळत आहे. त्यामुळे काजू, बदाम, पिश्ता, आक्रोड यांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत.
दर कमी झाल्याने यंदाच्या दिवाळीत सुकामेव्याच्या विक्रीत वाढ होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. दिवाळीत अनेकजण भेट स्वरूपात मिठाईऐवजी सुकामेव्याच्या पॅकिंगचा जास्त उपयोग करीत आहेत. ही प्रथा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे विक्रीला बळ मिळत आहे. कोरोना काळात निरोगी आरोग्यासाठी सामान्यांनीही सुकामेव्याची खरेदी केल्याने उठाव चांगला होता. तेव्हा दर जास्त होते. एक महिन्यापासून सुकामेव्याचे दर कमी होत आहेत. बदाम अमेरिकेतून तर पिश्ता व आक्रोड इराक व अन्य देशातून येतात. सध्या या देशांमध्ये स्थिती चांगली नसून इराकच्या चलनात घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाव घसरले आहेत. सर्वाधिक घसरण काजू, बदाम आणि पिश्ता यात झाली असून प्रति किलो ३०० रुपयांपर्यंत घट झाल्याचे दिसून येत आहे.
सुकामेव्याचा सर्वाधिक वापर मिठाई, हॉटेल, लग्नसमारंभात होतो. कोरोनामुळे हॉटेल्सचा व्यवसाय खूपच कमी झाला आहे. विवाहदेखील कमी होत आहेत. मिठाईचा वापरही कमी झाला आहे. याशिवाय आईस्क्रीममध्ये जास्त उपयोग होतो. पण यंदा कोरोनामुळे उन्हाळ्यात आईस्क्रीमची विक्री लक्षणीय कमी झाल्याने सुकामेव्याला उठाव कमी होता. त्याचा परिणाम भाव घसरणीवर झाल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले.
महावीर मेवावालाचे संचालक अरुण व अतुल कोटेचा म्हणाले, अमेरिकन बदाम प्रति किलो ९०० रुपयांवरून ६०० ते ७०० रुपये, काजू १००० रुपयांवरून ७०० ते ८०० रुपये, पिश्ता १२०० रुपयांवरून ९०० रुपये, अंजीर ११०० रुपयांवरून ९०० रुपये, आक्रोड १२०० रुपयांवरून १००० रुपये आणि किसमिसचे दर दर्जानुसार २०० ते ४०० रुपये किलो आहेत. यंदा भाव कमी झाल्याचा फायदा दिवाळीत होणार आहे. सुकामेव्याच्या पॅकिंगला मागणी राहणार आहे. पॅकिंगचा व्यवसाय १५ दिवसांपूर्वीच सुरू झाला आहे.
मंत्री ट्रेडर्सचे संचालक गोविंद मंत्री म्हणाले, सुकामेव्याचे दर कमी झाल्याचा फायदा दिवाळीत सामान्यांना होणार आहे. यंदा विक्री वाढणार आहे. मिठाई घेण्याऐवजी सुकामेव्याचे बॉक्स खरेदीवर लोकांचा भर वाढला आहे. आता कॉर्पोरेट क्षेत्रात सुकामेव्याचे बॉक्स भेट स्वरूपात देण्याचा कल वाढला आहे. यंदा परवडणाऱ्या किमतीत ग्राहकांना खरेदीची संधी आहे.