जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 09:36 PM2022-08-25T21:36:06+5:302022-08-25T21:36:56+5:30
Nagpur News जल प्रदूषण टाळण्यासाठी मातीच्या इकोफ्रेंडली श्री गणेशाची स्थापना करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा. असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.
नागपूर : रासायनिक रंग आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी मातीच्या इकोफ्रेंडली श्री गणेशाची स्थापना करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा. असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.
३१ ऑगस्टला गणेशाची स्थापना होत आहे. यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. गणेशोत्सव हा पर्यावरण पुरक व्हावा, याकरिता पीओपी गणेशमूर्तीची स्थापना न करता, मातीच्या, इकोफ्रेंडली मूर्तीची स्थापन करा, असे आवाहन मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे.
पीओपी मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग घातक रसायण व धातू मिश्रित असतात. तांबे, क्रोमियम, कॅडमियम, निकेल, लेड, मक्युरी आदींचा समावेश असतो. ते पर्यावरण आणि मानवाकरिता हानिकारक आहेत. रासायनिक रंगामुळे तलावात, पाण्यात घातक धातूंची मात्रा वाढल्याने जलचरांवर त्याचा विपरित परिणाम होतो, जो अन्न साखळीद्वारे मानवास देखील घातक ठरू शकतो. त्यामुळे, नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची स्थापना करू नये, असे आवाहन केले आहे.
खात्री करूनच मूर्ती खरेदी करा
नागरिकांनी दुकानदार, व्यावसायिक यांच्याकडून श्री गणेशाची मूर्ती खरेदी करताना मूर्ती संपूर्ण मातीची किंवा शाडू मातीची आहे, याची खात्री करूनच मूर्ती खरेदी करावी. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना घरोघरी करण्यात यावी, असे मनपाने आवाहन केले आहे.
.......