होळी साजरी करा जपून, मोकळ्या मैदानाचा वापर करा; महावितरणचे आवाहन
By आनंद डेकाटे | Published: March 20, 2024 05:06 PM2024-03-20T17:06:32+5:302024-03-20T17:07:43+5:30
आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव जल्लोषात साजरा होतो.
आनंद डेकाटे,नागपूर : आनंद, उत्साह आणि उल्हास यांचा सण म्हणजे होळी. आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव जल्लोषात साजरा होतो. आयुष्यात आनंद देणाऱ्या रंगांना या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्यांची उधळण केलीच पाहिजे, पण जरा जपून. आपली आणि इतरांचीही काळजी घेत रंग उधळले, तर रंगपंचमी नक्कीच आनंददायक होऊ शकेल. होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहीत्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जीवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील, होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या.
होळीच्या रात्री बरेचदा रस्त्यावर होत असलेल्या हुल्लडबाजीचा फ़टका परिसरातील वीज ग्राहकांनाही होत असतो, बेधुंद वाहन चालकांमुळे अनेकदा वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्यासोबतच जीवित व वित्त हानी होण्याचा धोका असल्याने याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्या.
रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकताना ते वीजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. विजेचा खांबांना स्पर्श करू नका. घरात होळी खेळताना वीज मिटर, वीजेचे प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा, ओल्या हाताने वीजेच्या बटनांना स्पर्श करू नका. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता २४ तास सुरू असणारे निशुल्क क्रमांक १९१२, १९१२०, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ यावर संपर्क साधा.
अशी घ्या काळजी -
१) विजेच्या खांब आणि वीजवाहिन्या पासून दूर रहा
२) वीज वितरण यंत्रणा पासून लांब अंतरावर होळी पेटवा
३) वीज वाहिन्या, वितरण रोहीत्रांवर पाणी फेकू नका.
४) रंगीत पाणी वीज उपकरणांवर टाकू नका
५) ओल्या हाताने वीज उपकरणांना स्पर्श करू नका
६) वीज खांबाभोवती पाण्याचा निचरा करु नका.