केंद्र सरकारने उत्तरासाठी वेळ मागितला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:07 AM2020-12-08T04:07:19+5:302020-12-08T04:07:19+5:30
नागपूर : केंद्र सरकारने उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीएम केअर फंडसंदर्भातील पुनर्विचार याचिकेवरील ...
नागपूर : केंद्र सरकारने उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीएम केअर फंडसंदर्भातील पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी १६ डिसेंबरपर्यंत तहकूब केली.
ही याचिका अॅड. अरविंद वाघमारे यांनी दाखल केली आहे. त्यांची पीएम केअर फंडसंदर्भात विविध चार मागण्या करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गेल्या २७ ऑगस्ट रोजी फेटाळून लावली. त्या निर्णयावर पुनर्विचार व्हावा असे वाघमारे यांचे म्हणणे आहे. पीएम केअर फंडमध्ये किती रक्कम जमा झाली आणि आतापर्यंत फंडमधील रकमेचा कशाकरिता उपयोग करण्यात आला, याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, पीएम केअर फंडच्या विश्वस्त मंडळातील तीन रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, त्यापैकी दोन विश्वस्त विरोधी पक्षांमधून निवडण्यात यावे आणि फंडच्या लेखा परीक्षणाकरिता नवी दिल्ली येथील मे. सार्क असोसिएट्सची नियुक्ती करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, या चार मागण्यांचा जनहित याचिकेत समावेश होता.