राज्यभरातील १० लाख नादुरुस्त वीजमीटर महिन्याभरात बदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:44 AM2018-04-07T00:44:55+5:302018-04-07T00:45:09+5:30
विदर्भातील २ लाख मीटरसह राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील २ लाख मीटरसह राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. राज्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई मुख्यालयात आयोजित मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
नागपूर परिमंडळात येणाऱ्या वर्धा जिल्ह्यात २१, १९३ तर नागपूर शहर आणि ग्रामीण मंडळ कार्यालय अंतर्गत २१,७६४ वीज मीटर्स बदलण्यात येणार आहेत.
संजीव कुमार म्हणाले, अचूक बिलिंगसाठी विशेषत्वाने प्रयत्न सुरु आहेत. नवीन वीजजोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिंगल फेजचे आणखी ३० लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नादुरुस्त आढळून आलेले १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे वीजमीटर सर्वप्रथम एक महिन्याच्या कालावधीत बदलण्यात यावेत. त्यानंतर नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाही याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरित बदलण्याची काळजी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली.
महावितरणच्या राज्यभरातील १६ परिमंडळात सद्यस्थितीत नादुरुस्त असल्याचे आढळून आलेल्या एकूण १० लाख ३७ हजार सिंगल फेज नादुरुस्त वीजमीटरमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागातील १ लाख ८५ हजार, नागपूर प्रादेशिक विभाग - २ लाख, कोकण प्रादेशिक विभाग -४ लाख ५३ हजार तसेच पुणे प्रादेशिक विभागातील १ लाख ९८ हजार मीटरचा समावेश आहे. हे सर्व नादुरुस्त वीजमीटर तातडीने बदलण्यासाठी येत्या महिन्याभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या बैठकीला संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन, संचालक (संचालन) अभिजित देशपांडे, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांच्यासह प्रादेशिक व कार्यकारी संचालक तसेच मुख्य अभियंता, वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.