११ वी प्रवेशाचे मेरिट नियम बदलले; प्रवेश नाकारल्यास एकाच राउंडमध्ये हाेणार नाही नावाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 03:37 PM2022-06-11T15:37:05+5:302022-06-11T15:42:17+5:30
केंद्रीय प्रवेश समितीने ईयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११,२२४ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे.
आशीष दुबे
नागपूर : राज्य शिक्षण विभागाने वर्ग ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये माेठे बदल केले आहेत. याअंतर्गत दहाव्या वर्गात समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मेरीट यादीमध्ये समान स्थान मिळणार नाही. यापुढे अशा विद्यार्थ्यांची मेरीट जन्मतारखेच्या आधारावर ठरेल. याशिवाय आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेमध्ये आरक्षणापासून वंचित राहणाऱ्या एसईबीसीच्या विद्यार्थ्यांनाही यापुढे ११ वीच्या प्रवेशादरम्यान आरक्षणाची सुविधा मिळेल.
शिक्षण विभागाने याशिवाय प्रवेशाच्या काेणत्याही टप्प्यात ईनहाउस काेट्याची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखादा विद्यार्थी पहिल्या किंवा काेणत्याही टप्प्यात प्रथम श्रेणीच्या अभ्यासक्रमात किंवा मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास नकार देईल किंवा प्रवेश रद्द करेल, तरी त्याला केवळ एका राउंडमध्ये सहभागी हाेण्यास मनाई केली जाईल. हे सर्व बदल तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहेत.
यापूर्वी समान गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरीट यादीत समान स्थान दिले जात हाेते. मात्र यापुढे त्यांची जन्मतारीख बघितली जाईल. विद्यार्थ्याच्या वयाच्या आधारे त्याची रॅंक ठरविली जाईल. जन्मतारीखही सारखी असेल तर पालक व आडनावासह त्याचे पूर्ण नाव पाहिले जाईल. त्या आधारावर त्याचे मेरीट यादीतील स्थान ठरेल. प्रवेश समितीद्वारे यापूर्वी प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रथम श्रेणीचे अभ्यासक्रम किंवा मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास नकार देणाऱ्या किंवा प्रवेशच रद्द करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रक्रियेतील तीन राउंडमध्ये सहभागी हाेण्यास मनाई करीत हाेती. नियमात बदल केल्याने अशा विद्यार्थ्यांना आता एकाच राउंडमधून बाहेर राहावे लागेल.
अकरावी प्रवेशासाठी ११ हजार विद्यार्थ्यांनी केली नाेंदणी
केंद्रीय प्रवेश समितीने ईयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११,२२४ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. राज्य शिक्षण मंडळाचा ईयत्ता १० वीचा निकाल २० जूनला घाेषित हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतर सीबीएसई, आयसीएसई व इतर बाेर्डाचे निकालाचीही प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश देण्यात येतात. त्यानुसार केंद्रीय समितीने प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थी नाेंदणीचे कार्य सुरू केले आहे. यामध्ये राज्य बाेर्डाच्या १०,६०५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. याशिवाय सीबीएसईच्या ५५७, आयसीएसईच्या ३६, आयबीचा १, एनआयओएसचा १, तर इतर बाेर्डाच्या २४ विद्यार्थ्यांची नाेंद झाली आहे. नाेंदणी प्रक्रिया निकालानंतरही सुरू राहणार असून त्यानंतर प्रक्रियेच्या भाग-२ अंतर्गत विद्यार्थ्यांना पसंतीची महाविद्यालय भरायचे आहे.