एकाच हाताने ओढतोय संसाराचा रथ
By admin | Published: May 8, 2017 02:42 AM2017-05-08T02:42:07+5:302017-05-08T02:42:07+5:30
प्रवाहाच्या दिशेने सारेच पोहतात. वेगळा तोच ठरतो जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचे धाडस करतो.
अपंगत्वावर मात : अखंड संघर्षातही मुलांना देतोय उच्च शिक्षण
दयानंद पाईकराव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाहाच्या दिशेने सारेच पोहतात. वेगळा तोच ठरतो जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचे धाडस करतो. संघर्षमय आयुष्यातही रोजचे जगणे सुंदर करणारे ललेंद्र कराडे यांची साहसकथाही अशीच आहे. जन्मजात एका हाताने अपंग असूनही आपल्या हिमतीच्या भरवशावर ते केवळ कुटुंबाचा रथ ओढतच नाहीत तर मुलांनाही उच्च शिक्षण देत आहेत. केवळ परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून जगण्याची लढाई अर्धवट सोडू पाहणाऱ्या अनेकांसाठी ललेंद्र कराडे एक आशादायी आदर्श आहेत.
जरीपटक्याच्या हुडको कॉलनीत राहणारा ललेंद्र श्रीराम कराडे हे कुणाचीही मदत न घेता एकाच हाताच्या भरवशावर भाजीविक्री करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत.
ते जन्मापासून उजव्या हाताने अपंग आहेत. परंतु त्यांच्या मनातील जिद्द आकाशाला गवसणी घालणारी आहे. एका हाताने अपंग असला तरी आपल्या अपंगत्वाचा त्याने बाऊ केला नाही अन् कुणासमोर हातही पसरला नाही. उपजीविका भागविण्यासाठी त्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आपण पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वास मनात आल्यानंतर त्याने लग्नाचा विचार करून लग्न केले. त्यांच्या संसारवेलीवर एक मुलगा आणि एक मुलगी अशी फुले उमलली. भाजी विक्रीतून ललेंद्र संसाराचा रथ ओढत असताना दिवसेंदिवस त्याची मुलेही लहानाची मोठी होत होती. ती शाळेत जाऊ लागली. महागाईच्या युगात शिक्षण महाग झाले असताना ललेंद्रने आपल्या मुलांना शिक्षणात कुठेही काही कमी पडू दिले नाही. आज त्याची मुलगी बीए दुसऱ्या वर्गाला तर मुलगा बीएच्या पहिल्या वर्गाला शिकत आहे.
एकाच हाताने ठेला चालवून त्याला भाजी विकताना पाहिले की अनेक जण नवल करून त्याच्या जिद्दीचे कौतुक करतात. त्याची ही जिद्द इतर अपंग व्यक्तींना नक्कीच प्रेरणा देणारी आहे.
सकाळीच जातात
कॉटन मार्केटला
ललेंद्र भल्या पहाटे उठून भाजीपाला खरेदी करण्यासाठी कॉटन मार्केटला जातात. तेथून भाजी खरेदी केली की सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते भाजी विकतात अन् सायंकाळी घरी परततात. उन्हाळा असो, पावसाळा की कडाक्याची थंडी ललेंद्रच्या दिनचर्येत आजवर कोणताच फरक पडला नाही.