ड्रग्ज प्रकरणाची ईओडब्ल्यू व क्राइम ब्रँचमार्फत चौकशी करावी; अतुल लोंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 09:16 PM2021-11-02T21:16:56+5:302021-11-02T21:19:10+5:30
Nagpur News गुजरातमधील मुंद्रा अदानी पोर्टवर ३००० किलो ड्रग साठा पकडला गेला. यात भाजपचे नेते, भाजपशी संबंधित लोक यांचा सहभाग आहे. या कारवाईवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच एमसीबीमार्फत क्रूझवर रेड टाकून काही ग्रॅम ड्रग पकडून हे प्रकरण तापवत ठेवले गेले.
नागपूर : ड्रग्जच्या काळ्या धंद्यात भाजपचे नेते, भाजपशी संबंधित लोक यांचे मोठे रॅकेट आहे. त्याच्याशी संबंध असलेल्या मनीष भानुशाली, के. पी. गोसावी, रवींद्र कदम आणि एनसीबीचे समीर वानखेडे यांचे रॅकेट काम करत आहे, असा खळबळजनक आरोप करत या एकूणच प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) आणि क्राइम ब्रँचमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
लोंढे म्हणाले, गुजरातमधील मुंद्रा अदानी पोर्टवर ३००० किलो ड्रग साठा पकडला गेला. यात भाजपचे नेते, भाजपशी संबंधित लोक यांचा सहभाग आहे. या कारवाईवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच मुंबईत एमसीबीमार्फत क्रूझवर रेड टाकून काही ग्रॅम ड्रग पकडून हे प्रकरण तापवत ठेवले गेले. अदानी मुंद्रा पोर्टवरील ड्रग्ज व मुंबईतील एनसीबीची रेड यात काही समान धागेदोरे आहेत. के.पी. गोवासी, मनीष भानुशाली व एनसीबीचे समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी संबंध येत आहे. समीर वानखेडेसोबत सुनील पाटील, सुनील पाटीलसोबत मनीष भानुशाली आणि मनीष भानुशालीसोबत के. पी. गोसावी हे एक वर्तुळ आहे, तर नीरज यादव हा मध्य प्रदेश भाजपचा कार्यकर्ता आहे. हे सर्वजण या रॅकेटचा हिस्सा आहेत, असा आरोप त्यांनी केला.
या सगळ्या ड्रग्सच्या लिंकमध्ये सॅम डिसोझा, मनीष भानुशाली, किरण गोसावी, फ्लेचर पटेलपर्यंत यांचे फोटो किरीटसिंग राणांसोबत दिसतात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतात. मुंद्रा पोर्टवर पकडण्यात आलेल्या ड्रग्जची चौकशी डीआरआयकडून काढून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या डीआरआयकडे वर्ग का करण्यात आली, असा सवाल लोंढे यांनी केला.
रवींद्र कदमला अटक करा, बरेच खुलासे होतील
- २१ सप्टेंबरला मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज पकडले गेले त्यानंतर २२ सप्टेंबरला के.पी. गोसावी व भानुशाली गुजरातमध्ये पोहोचले व गुजरातचे मंत्री किरिटसिंह राणा यांना भेटले. मुंद्रा पोर्ट ड्रग, एनसीबीची मुंबईतील रेड व ५० लाख रुपयांची देवाणघेवाण झाली (खंडणी) अशी डिसुझाने माहिती दिली. या सर्व प्रकरणात एक इनोव्हा कार वापरण्यात आली, त्या इनोव्हा कारचा नंबर एमएच १२, जेजी ३००० असून, ही इनोव्हा कार रवींद्र कदम यांच्या नावावर आहे. यासाठी जो पत्ता दिलेला आहे तो कराडचा आहे. कारच्या मालकाचे नाव रवींद्र कदम, पत्ता ८१५, माणिक चौक, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा असा नोंदलेला आहे. पण या पत्त्यावर रवींद्र कदम नावाचा कोणी व्यक्ती राहात नाही. ज्या रवींद्र कदमची कार आहे तो यातील मास्टर माइंड आहे की गुर्गा, याची चौकशी करण्याची मागणी लोंढे यांनी केली.