नागपुरात फुग्यामुळे बालकाने गमावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:28 AM2019-01-28T11:28:21+5:302019-01-28T11:29:00+5:30
फुगा फुगविण्याचा प्रयत्न करीत असताना फुग्याचा तुकडा तोंडात जाऊन गळ्यात अडकल्यामुळे एका बालकाचा जीव गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुगा फुगविण्याचा प्रयत्न करीत असताना फुग्याचा तुकडा तोंडात जाऊन गळ्यात अडकल्यामुळे एका बालकाचा जीव गेला. मृत बालकाचे नाव सानिध्य आनंद उरकुडे आहे, तो सहा वर्षांचा आहे. त्याचे वडील कपड्याच्या दुकानात काम करतात. उरकुडे दाम्पत्य महाल परिसरात किरायाने राहतात. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
लहान मुले फुगे फुटल्यानंतर त्याची चिटकुली बनवितात. यात फुग्याला तोंडात टाकून फुगविल्या जाते. सानिध्यसुद्धा चिटकुली बनविण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी घरात सानिध्यची आई कामात व्यस्त होती. चिटकुली बनविण्याच्या प्रयत्नात फुगा सानिध्यच्या तोंडात गेला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे ती तडफडायला लागला. त्याला बोलता येत नसल्याने त्याच्या आईला गळ्यात काहीतरी अडकल्याचा संशय आला. तिने सानिध्यला पाणी पाजले. त्यामुळे फुगा अन्ननलिकेत फसला. त्यामुळे श्वास घेण्यास त्याला त्रास होत होता. लगेच त्याच्या आईने शेजाऱ्यांना आवाज दिला. शेजारी सानिध्यला घेऊन परिसरातील खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्याला मृत घोषित केले. सानिध्यच्या आईला डॉक्टरांवर विश्वास होत नव्हता, तिने काही वेळापूर्वीच सानिध्यला हसताना, खेळताना बघितले होते. त्यामुळे शेजारी त्याला मेयो रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
पालकांसाठी धडा
ही घटना पालकांसाठी एक धडा ठरू शकते. किल्ला मार्ग परिसरात या घटनेची चर्चा आहे. सुरुवातीला लोकांचा विश्वास होत नव्हता. सानिध्यचा मृतदेह घरी आल्यानंतर लोकांना त्याची गंभीरता लक्षात आली. सानिध्यच्या शवविच्छेदन अहवालात फुगा अन्ननलिकेत फसल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे.