नागपूर : कोरोनाचे संभाव्य तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असताना लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत. मेडिकलच्या बालरोग विभागाच्या ‘ओपीडी’त जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात ७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘आयपीडी’मध्येही रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांची वाढलेली संख्या व संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याने त्यांचे लसीकरण कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे लहान मुलांमध्ये व्हायरल, डेंग्यू, टायफॉईड, अतिसार, मेंदूज्वर आदी आजाराचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. मेडिकलच्या बालरोग विभागातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व आंतररुग्ण विभागात (आयपीडी) मार्च महिन्यात कमी झालेली रुग्णसंख्या जून महिन्यांपासून वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात व्हायरल व डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-अशी वाढली ‘ओपीडी’
कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाली. त्यापूर्वी जानेवारीमध्ये मेडिकलच्या बालरोग विभागाच्या ‘ओपीडी’त १०७० तर फेब्रुवारीमध्ये १०३१ रुग्णांनी उपचार घेतले. मार्चमध्ये कोरोनाचा जोर वाढताच ओपीडीतील रुग्णसंख्येत घट आली. ७०६ रुग्णांची नोंद झाली. एप्रिलमध्ये कोरोनाने उच्चांक गाठताच निम्म्याने रुग्णसंख्या कमी होऊन ३६० झाली. मे महिन्यात ४००वर आलेली ओपीडी कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताच जून महिन्यात वाढून ९६४ वर पोहोचली. तर जुलै महिन्यात ७७ टक्क्याने वाढ होत १७०७ झाली. १८ ऑगस्टपर्यंत १३१७ रुग्णांनी उपचार घेतले. विशेष म्हणजे, जून महिन्यात ‘आयपीडी’मध्ये आलेल्या बालरुग्णांची संख्या ३२२ असताना जुलैमध्ये ही संख्या वाढून ५२५ झाली.
-४० टक्के मुलांची कोरोना तपासणी
कोरोना व डेंग्यूची लक्षणे जवळजवळ सारखीच असतात. यामुळे यातील जवळपास ४० टक्के मुलांची कोरोनाची तपासणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. परंतु मागील आठवडाभरात एकही बालक पॉझिटिव्ह आलेला नाही.
-ही घ्या काळजी
: झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
: संपूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरा
: बाहेरचे व उघड्यावरील खाद्य पदार्थ टाळा
: पाणी उकळून व थंड करूनच प्या
: पूर्ण शिजलेले व ताजे अन्नाचे सेवन करा
: वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता पाळा
: कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या
-व्हायरल व डेंग्यूच्या रुग्णांत मोठी वाढ
वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांमध्ये व्हायरल, तर डासांमुळे डेंग्यूचा रुग्णांत वाढ झाली आहे. यामुळे कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वत:हून औषधी घेणे टाळा. लहान मुलांना डास चावणार नाही याची खबरदारी घ्या.
-डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ