चिमुकल्यांना हवी शाळा, पालक म्हणतात सध्या टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:12 AM2021-02-17T04:12:04+5:302021-02-17T04:12:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’ची धास्ती कायम असली तरी राज्य शासनाच्या निर्देशांनंतर नागपुरातील पाचवीपासूनच्या शाळांना सुरुवात झाली आहे. ...

Chimukalya wants a school, parents say, avoid it right now | चिमुकल्यांना हवी शाळा, पालक म्हणतात सध्या टाळा

चिमुकल्यांना हवी शाळा, पालक म्हणतात सध्या टाळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कोरोना’ची धास्ती कायम असली तरी राज्य शासनाच्या निर्देशांनंतर नागपुरातील पाचवीपासूनच्या शाळांना सुरुवात झाली आहे. शाळांमध्ये आता उपस्थिती व उत्साह दोन्हीदेखील दिसून येत आहे. मात्र पहिली ते चौथी इयत्तेतील विद्यार्थी मात्र घरी बसून कंटाळले आहेत. ‘ऑनलाईन’ वर्गातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. मात्र चिमुकल्या मुलांना शाळेची ओढ लागली आहे. दुसरीकडे पालकांमध्ये अद्यापही ‘कोरोना’ची धास्ती असून सध्या तरी लहान मुलांच्या शाळा सुरू करण्याची परवानगी द्यायला नको, असा सूर दिसून येत आहे.

जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या १ हजार ९०० हून अधिक शाळा असून विद्यार्थी संख्या चार लाखांहून अधिक आहे. मार्च महिन्यापासून शाळा बंद असून लहानगे अक्षरश: कंटाळले आहेत. नवीन सत्रात त्यांनी एकदाही शाळेचा चेहरा पाहिला नसून ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच शिक्षण सुरू आहे. मात्र ‘ऑनलाईन’ वर्गांमध्ये विद्यार्थी लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. इंटरनेट, गोंगाट, कनेक्टिव्हिटी इत्यादी मुद्द्यांमुळे अनेक जणांना वर्गात शिकविले जाणारे मुद्देदेखील नीट कळत नाहीत. मित्र-मैत्रिणी दिसतात, मात्र त्यांच्याशी बोलूदेखील शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची प्रचंड ओढ लागली आहे. त्यासाठी पालकांसोबत शिक्षकांकडेदेखील ते आपले गाऱ्हाणे मांडताना दिसून येतात.

दुसरीकडे पालकांमध्ये मात्र ‘कोरोना’ची धास्ती आहे. मुले कंटाळली आहेत हे बरोबर आहे. त्यांना प्रत्यक्ष वर्गातच शिक्षण मिळायला हवे. मात्र ‘कोरोना’च्या दिशानिर्देशांचे ही मुले पालन करु शकतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे सध्या चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे टाळले पाहिजे, असे पालकांचे म्हणणे आहे.

मुले म्हणतात, शाळा हवी

मला माझ्या मित्रांना भेटायचे आहे. मॅडमला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. आम्ही मास्क घालू, पण शाळा सुरू करा.

- रुद्र कुमार, पहिलीचा विद्यार्थी

रोज सकाळी लॅपटॉपवर अभ्यासाला बसतो. पण ‘व्हाईटबोर्ड’ची मजा त्यात येत नाही. शाळा असली की मज्जा येते. खेळता येते.

-पी. श्रीजित, दुसरीचा विद्यार्थी

शाळेतील मधल्या सुटीत मैत्रिणींसोबत मी धम्माल करायचो. आता घरीच बसून अभ्यास असल्याने खेळणेदेखील नाही आणि डब्याची वाटावाटीदेखील नाही. शाळा सुरू करा.

-तेजस जोशी, तिसरीचा विद्यार्थी

माझ्या बिल्डिंगमधले दादा शाळेत जातात. मला मात्र घरीच रहावे लागते. शाळेतील मित्रांची आठवण येते आणि वर्गातील बेंचेसदेखील खूप आठवतात. ‘कोरोना’ आहे , पण ‘मास्क’ घालून शाळा सुरू करा.

-ओवी साठवणे, चौथीची विद्यार्थिनी

पालक चिंताग्रस्तच

‘कोरोना’ रुग्णांची संख्या वाढते आहे. अशा स्थितीत आमच्या मुलांना शाळेत पाठविणे हे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे सध्या शाळा नकोच

-सोनिया सिंह, पालक

शाळा सुरू व्हाव्यात असे सर्वांनाच वाटते. मात्र कोरोनावर अद्यापही नियंत्रण आलेले नाही. लहान मुले कितपत ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळतील हादेखील प्रश्न आहेच.

-प्रवीण देवगीरकर, पालक

संपूर्ण वर्ष तर ऑनलाईनमध्ये गेले. मुलांचा अभ्यास होतो आहे. स्थिती लक्षात घेता सध्या असेच शिक्षण सुरू राहणे योग्य आहे. नियंत्रण आल्यावर शाळा सुरु व्हाव्या.

- अपूर्वा पांडे, पालक

लहान मुले चंचल असतात. त्यामुळे ते ‘मास्क’ किती वेळ ठेवतील, ‘सोशल डिस्टन्सिंग’ किती पाळतील हा प्रश्नच आहे. शिक्षकदेखील त्यांच्यावर किती व कुठे कुठे लक्ष ठेवणार ?

- चैताली जिभकाटे, पालक

Web Title: Chimukalya wants a school, parents say, avoid it right now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.