मेडिकलमध्ये पाच वर्षांत २३५६ नवजात शिशुंचा मृत्यू : रेफर केलेल्या बालकांसाठी ‘एनआयसीयू’च नाहीसुमेध वाघमारे नागपूरबालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. आरोग्यासाठी मोठा निधी देत आहे. ग्रामीण भागांत मृत्यूदर रोखण्यात शासनाला काही प्रमाणात यशही आले आहे, परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) चित्र याच्या उलट आहे. गेल्या पाच वर्षांत शून्य ते पाच दिवसांतील २ हजार ३५६ नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे. या चिमुकल्यांच्या कोंडणाऱ्या श्वासामागे आवश्यक उपकरणांचा तुटवडा आणि अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेरून येणाऱ्या नवजात शिशुंसाठी नसलेले बाल दक्षता कक्ष (एनआयसीयू) हे कारण ठरत आहे. मेडिकलमध्ये बालरोग विभागात ३, ५ व ६ असे तीन वॉर्ड आणि ३० खाटांचे ‘एनआयसीयू’ आहे. विशेष म्हणजे, एनआयसीयूमध्ये फक्त मेडिकलमध्ये प्रसुती झालेल्या मातांचे शिशू ठेवले जातात. मेयो किंवा इतर रुग्णालयातून कितीही गंभीर अवस्थेत नवजात शिशू आल्यास त्याला या कक्षामध्ये ठेवले जात नाही. त्याच्यावर जनरल वॉर्डात उपचार केले जातात. या वॉर्डात ‘न्युओलेटर व्हेन्टिलेटर’ नाही. मॉनिटर सिस्टीम आहे ती तोकडी आहे. रेडियम वॉर्मर नाही. इन्फुयन पंप नाही. वातानुकूलित यंत्र नाही. फोटोथेरपी नाही. जनरल वॉर्ड असल्याने नवजात शिशूला लवकर संसर्ग होण्याची भीती असते. यामुळे की काय, मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. २०११ मध्ये ५०५, २०१२ मध्ये ४१६, २०१३ मध्ये ४७४, २०१४मध्ये ४७३ तर आॅक्टोबर २०१५ पर्यंत ४८४ नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे. शासनाने आवश्यक प्रमाणात ही उपकरणे उपलब्ध करून दिली असती तर ही बालके वाचली असती, असे मेडिकलच्याच एका बालरोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे. बाहेरून आलेले शिशू एनआयसीयू’मध्ये ठेवण्यासाठी १०० खाटांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. ३० खाटांची क्षमता असलेल्या ‘एनआयसीयू’मध्ये केवळ मेडिकलमध्ये जन्माला आलेली नवजात बालके ठेवली जातात. या खाटाही त्यांच्यासाठी कमी पडत असल्याने अनेकवेळा एका खाटेवर दोन बालकांंवर उपचार केला जातो. परंतु येथेही उपकरणांच्या तुटवड्यामुळे चिमुकल्यांच्या जीवावर बेतते. १० ‘न्युओलेटर व्हेन्टिलेटर’ची गरज असताना केवळ तीन आहेत. कावीळ झालेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले फोटोथेरपी उपकरणांची दहाची गरज असताना तेही तीनच आहेत, मॉनिटर सिस्टीम व वॉर्मरची संख्याही तोकडी आहे. इन्फुयन पंपची १० गरज असताना केवळ सहाच सुरू आहेत. यातील काही उपकरणे तर बंद स्थितीत आहे. याचा परिणाम, चिमुकल्यांच्या आरोग्यावर होत असून या कक्षातून ती बाहेर आल्यास त्यांचा दुसरा जन्मच ठरत आहे.
चिमुकल्यांचा कोंडतोय ‘श्वास’
By admin | Published: December 11, 2015 3:37 AM