चीन हे गृहित न धरता येणारे राष्ट्र

By admin | Published: July 30, 2015 03:24 AM2015-07-30T03:24:02+5:302015-07-30T03:24:02+5:30

शेजारच्या राष्ट्रांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राष्ट्रांचे दौरे केले.

China is a non-assuming nation | चीन हे गृहित न धरता येणारे राष्ट्र

चीन हे गृहित न धरता येणारे राष्ट्र

Next

नागपूर : शेजारच्या राष्ट्रांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राष्ट्रांचे दौरे केले. यात अनेक देशांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. पंतप्रधानांनी चीनचाही दौरा केला आहे. पण मोदी यांच्या दौऱ्यानंतर भारत आणि चीन यांचे संबंध संपूर्ण मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे झाले, असे मानणे गैर आहे. चीन अतिशय मुत्सद्दी आणि गृहित न धरता येणारे राष्ट्र आहे, असे मत इंडियन असोसिएशन आॅफ शांघायचे अध्यक्ष अमित विनय वाईकर यांनी व्यक्त केले.
भारत-चीन संबंध आणि भारतीय उद्योजकांना संधी विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्हीआयएच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी मोदी यांनी केलेल्या चीन दौऱ्याची माहिती दिली. या दौऱ्यासाठी कशा प्रकारची तयारी करण्यात आली आणि या दौऱ्याकडे पाहण्याचा चीनचा दृष्टिकोन कसा होता, हे त्यांनी सांगितले. चीन हा वरवर पाहिले तर साम्यवादी वाटतो. तेथे साम्यवादी पक्षाचेही निर्विवाद वर्चस्व आहे. पण चीन अमेरिकेपेक्षाही भांडवलवादी आहे. यामुळेच त्यांनी आतापर्यंत इतका विकास केला आहे. चीन कधीही विदेशी कंपन्यांच्या उत्पादनांचे युनिट सुरू करण्याला विरोध करीत नाही. केवळ त्या कंपनीने त्यांच्या उत्पादनांचे संपूर्ण उत्पादन चीनमध्येच करावे, अशी त्यांची अट असते.
चीन जागतिक स्तरावर छोटा डॉन म्हणून उभा असताना चीनच्या काही समस्याही आहेत. तेथे प्रत्येकालाच यश गाठायचे आहे. चिनी कंपन्यांनी व्हिएतनाम, फिलिपिन्स या देशांमध्ये विस्तार सुरू केला आहे. पण या कंपन्या भारतात येत नाही कारण भारतावर विश्वास नाही. भारतात उद्योगासाठी पोषक वातावरण नसल्याची भावना तेथील कंपन्यांमध्ये आहे.
या कंपन्या यायच्या असतील तर आपल्याला त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला नागपूर फर्स्ट या उद्योजक संस्थेचे फैझ वाहिद, व्हीआयएच्या इकॉनॉमिक फोरमचे ओ. एस. बागडिया, हेमंत लोढा, आसित सिन्हा आदी अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. चिनी कंपन्या मुत्सद्दी आहेत पण त्यांना फिलिपीन्स, व्हिएतनाम येथे उद्योगाला मर्यादा पडणार आहे. वैदर्भीय उद्योजकांनी सुयोग्य पद्धतीने त्यांना आमंत्रण दिले तर वैदर्भीय उद्योजकांना या कंपन्यांचे स्थानिक भागीदार होऊन लाभ मिळवणे शक्य आहे, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)

Web Title: China is a non-assuming nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.