चिंचभुवन उड्डाणपूल वाहतुकीसाठी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:08+5:302021-02-10T04:09:08+5:30
नागपूर : अखेर चार वर्षांनंतर वर्धा रोड चिंचभुवन येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी तयार झाला आहे. पुलाचे उद्घाटन १४ फेब्रुवारी सायंकाळी ...
नागपूर : अखेर चार वर्षांनंतर वर्धा रोड चिंचभुवन येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी तयार झाला आहे. पुलाचे उद्घाटन १४ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. हा समारंभ एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनच्या सभागृहात होणार आहे. ५० कोटीच्या गुंतवणुकीतून पुलाची निर्मिती करण्यात आली आहे.
पुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) केले आहे. आता उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे वर्धा मार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी होणार नाही. पुलाचे बांधकाम गेल्या चार वर्षांपासून सुरू होते. बांधकामाला एक वर्षाचा जास्त कालावधी लागला आहे. उड्डाणपुलालगत वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे पुलाचे आकर्षण वाढले आहे.
वर्धा रोडवर चिंचभुवनचा पूल पूर्वी एकेरी होती. शिवाय हा पूल जुना झाला होता. या मार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी ही नेहमीचीच बाब होती. वर्धा आणि चंद्रपूरला जाणारी वाहने कोंडीत फसत होती. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. या मार्गावर उड्डाणपुलाची निर्मिती करण्याची अनेक दिवसापासून मागणी होती, आता ती पूर्ण झाली आहे. आता लोकांना हा पूल वाहतुकीसाठी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. विशेषत: बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत जाणारे उद्योजक, कर्मचारी आणि कामगारांना दररोजच्या वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.
प्रकल्पाचे संचालक अभिजित जिचकार म्हणाले, पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून अंतिम लोड चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. तपासणी चमूने अहवाल दिला आहे. सूचनेनुसार सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या छोटे-छोटे काम बाकी असून दोन ते तीन दिवसात पूर्ण होणार आहे. पुलाचे उद्घाटन १४ फेब्रुवारीला होणार आहे.