लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांवर वारंवार आरोप केले. सहाव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू असताना राज्याचे मंत्री फिरहाद हकीम यांनी सीआयएसएफसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. निवडणुका झाल्यावर सीआयएसएफ जवानांची सीआयडी चौकशी करण्यात येईल, असे म्हणताना त्यांनी जवानांबाबत वाईट शब्दांचा प्रयोग केला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
शीतलकुची येथे मतदानादरम्यान हिंसाचार झाला होता. सुरक्षा यंत्रणांनी हिंसाचार करणाऱ्यांविरोधात गोळीबार केला होता. यानंतर सातत्याने तृणमूलच्या नेत्यांकडून सीआयएसएफवर आरोप करण्यात येत आहेत. ममता बॅनर्जी यांनीदेखील सीआयएसएफविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. फिरहाद यांनी आता दिलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विशेषतः त्यांनी सुरक्षा यंत्रणेविरुद्ध जी भाषा वापरली आहे ती अयोग्य असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.