- चाकूहल्ला करून साडेचार लाख लंपास
- दुचाकीस्वार आरोपींची शोधाशोध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीवरील दोन भामट्यांनी एका सुपारी व्यापाऱ्याला सिनेस्टाईल लुटले. आरोपींनी आधी त्याच्या कारला दगड मारून कार थांबवण्यास भाग पाडले. नंतर त्याच्या हातावर चाकू मारला अन् त्यानंतर त्याच्या कारमधील ४ लाख ६० हजारांची रोकड असलेली पिशवी लंपास केली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडली.
राजेश किसनसिंग चंदेल (वय ३९) असे या प्रकरणातील जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. ते सादगाव बाजार चाैक बुटीबोरी येथे राहतात. ठोक भावात सुपारी विकत घेऊन ती कापायची आणि पानटपरीवाल्यांना विकायची, असा त्यांचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री ७ च्या सुमारास पानटपरीवाल्याकडून त्यांनी आधी दिलेल्या मालाच्या रकमेची वसुली केली आणि ४ लाख ६० हजारांची रोकड घेऊन नागपूरच्या मस्कासाथमधील व्यापाऱ्याला देण्यासाठी निघाले. वेळाहरी गावाच्याजवळ त्यांच्या ओमनी कारला (एमएच ४०य बीई ५७२८) दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी दगड मारला. त्यामुळे चंदेल यांनी कार थांबवली. दुचाकीस्वार आरोपीने चंदेल यांच्या हाताला चाकू मारला. त्यामुळे घाबरलेले चंदेल कार सोडून टोल नाक्याकडे पळत सुटले. त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी कारजवळ नेले. तेवढ्या वेळेत आरोपींनी कारमधील रोकड असलेली पिशवी पळवून नेली. चंदेल यांनी बेलतरोडी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी लुटमारीच्या घटनेची माहिती देताच बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे धावले. मात्र आरोपी कधीचेच गायब झाले होते. पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज काढून आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी केली. मात्र, ते हाती लागले नाहीी. दरम्यान, चंदेल यांच्या तक्रारीवरून लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
---
दोनशे रुपये वाचविण्यासाठी?
चंदेल रोज हजारोंचा व्यवसाय करतात. मात्र, टोलनाक्याचे दोनशे रुपये वाचविण्यासाठी त्यांनी पांजरी वेळाहरी गावाजवळून रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावरून कार नेली अन् साडेचार लाख रुपये गमावून बसले. दरम्यान, आरोपींना त्यांच्याजवळ रोकड आहे हे कसे कळले, हा संशयाचा मुद्दा आहे. त्यामुळे आरोपीची चंदेल यांच्यावर नजर असावी किंवा ते त्यांच्या माहितीतीलच कुणी असावे, असा संशय आहे. पोलीस हा धागा पकडूनही आरोपींचा शोध घेत आहेत.
---