नागरिकांनी बंद पाडला नागपुरातील रामेश्वरीचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:36 PM2020-02-10T22:36:01+5:302020-02-10T22:37:18+5:30
सोमवारी रामेश्वरी व काशीनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भरणारा अनधिकृत बाजार परिसरातील नागरिकांनी बंद पाडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत आणि रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडी बाजारांचे अतिक्रमण काढण्याचा धडाका लावला आहे. या मोहिमेत नागरिकांनीही आता सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय सोमवारी रामेश्वरी व काशीनगर परिसरात आला. गेल्या अनेक वर्षांपासून तेथे भरणारा अनधिकृत बाजार परिसरातील नागरिकांनी बंद पाडला.
मागील काही वर्षांपासून काशीनगर येथील सम्राट अशोक कॉलनी परिसरात दर सोमवारी अनधिकृत साप्ताहिक बाजार भरतो. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, याची दखल घेतली जात नव्हती. आठवडी बाजारातील अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. गुन्हेगारी घटनाही वाढल्या होत्या.
दरम्यान तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच अनधिकृत आठवडी बाजारांवर कारवाई सुरू केली. नियोजित जागेवरच बाजार भरावा, त्यांच्या या भूमिकेचे समर्थन करीत सम्राट अशोक कॉलनी काशीनगर, रामेश्वरी रहिवासी कृती समिती व सम्राट अशोक कॉलनी बुद्ध विहार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिसरातील सोमवार बाजार भरणार नाही, अशी भूमिका घेतली. प्रशासनाच्या कारवाईची वाट न बघता त्यांनी स्वत:च हा बाजार भरू नये, यासाठी पुढाकार घेतला आणि बाजार भरू दिला नाही.
सायंकाळी काही बाजारातील विक्रेते आणि स्थानिक रहिवासी यांच्यात वाद झाला. यानंतर अजनी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आणि मनपा कर्मचाऱ्यांनी येऊन स्थितीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दुकानदार आंदोलनाला विरोध करण्यासही पुढे आले. परंतु महिलांनी पुढाकार घेऊन एकही दुकान लावू दिले नाही.
सम्राट अशोक कॉलनी काशीनगर रहिवासी कृती समितीच्या अनिता कांबळे, सुनिता मगरे, संध्या पाटील, ज्योती झोडापे, भूपेंद्र बोरकर, डॉ. मधुकर मून, भीमराव मगरे, शिरीष जंगले, सचिन बोईनवार, सचिन श्रीवास, रोशन शेंडे, सोनू उपासक, अमित उपासक, अभय शंभरकर, अमीय पाटील, अर्जुन चव्हाण, राहुल येन्नावार आदी नागरिकांनी बाजार बंद करण्यात सक्रिय सहभाग नोंदविला.
उद्यान, समाज भवन उभारा
रामेश्वरी परिसरात महापालिकेची मोकळी जागा आहे. येथे बाजार बसविण्याचा घाट या सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. परंतु, दाट वस्तीसह रस्त्यांची समस्या असलेल्या या पट्ट्यात बाजाराऐवजी परिसरातील नागरिकांना गरज असलेले उद्यान, वाचनालय, समाज भवन, खेळाचे मैदान निर्माण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
जनतेचे आयुक्त अशी प्रतिमा
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बाजारासह निकृष्ट कामांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. प्रशासनाच्या चांगल्या कारवाईत स्वत: नागरिक योगदान देत असल्यामुळे संपूर्ण शहरात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास अनधिकृत कामांवर वचक बसेल, असे बोलतानाच तुकाराम मुंढे केवळ मनपाचे नव्हे तर खºया अर्थाने जनतेचे आयुक्त होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
असामाजिक तत्त्वाची दगडफेक
रामेश्वरी भागात घरांच्या दारासमोर बाजाराची दुकाने व ग्राहकांची गर्दी यामुळे अनेकांचे घरातून बाहेर निघणे बंद झाले आहे. स्थानिक नागरिकांना वेळप्रसंगी घरातून गाडी काढणे, प्रसंगी रुग्णाला सेवा पुरविणे कठीण झाले आहे. बाजारामुळे परिसरात घाण पसरते. लघुशंका, धूम्रपान, मद्यपान, शिवीगाळ आदींमुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या सोमवारी एका घरावर असामाजिक तत्त्वाने दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन हा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला.