डी डी नगर स्कूलमधील इयत्ता दहावी ‘ब’ चा वर्ग आणि नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 09:26 PM2019-12-15T21:26:11+5:302019-12-15T21:30:17+5:30
ज्या दहावी ‘ब’ च्या वर्गाखोलीतून त्यांंनी शालेय जीवनातील शेवटचे वर्ष पार केले त्या वर्गखोलीलाही त्यांनी भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी सदैव व्यस्ततेत आणि कामाच्या व्यापात असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी शनिवारची संध्याकाळ मात्र त्यांना विद्यार्थीजीवनात रमविणारी ठरली. आपल्या जुन्या शाळेमध्ये जाऊन ते शिक्षकांना भेटले. माजी विद्यार्थ्यांची गळाभेटही घेतली. एवढेच नाही तर, आपल्या शाळेला आयकॉन बनविण्यासाठी त्यांनी सर्वांना आवाहनही केले. निमित्त होते महालमधील डी डी नगर स्कुलच्या माजी विद्यार्थी सोहळ्याचे!
या शाळेची १५० व्या वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. या शतकोत्तर सूवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या पुढाकारातून शनिवारी सायंकाळी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा घडवून आणला. ‘माझी शाळा माझा गर्व’ या अंतर्गत आयोजित झालेला हा समारंभ भावस्पर्शी आणि तेवढाच जुन्या आठवणीत रमविणाराही ठरला.
या समारंभादरम्यान व्यासपीठावर नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ए. के. गांधी, अॅड. देव, मुख्याध्यापक गायकी, राठी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, या शाळेने आपणास घडविले, त्याचा मोठा अभिमान वाटतो. ही शाळा आणि संस्था मोठी व्हावी. मुंबईतील तरंगता पूल जसा मुंबईचा आयकॉन आहे, तशीच ही शाळाही आयकॉन ठरावी. त्यासाठी सारे मिळून सहकार्य करू. सरकारकडून मदत मिळविण्यासाठी कोणतीच अडचण जाणार नाही. शतकोत्तर सूवर्ण महोत्सवी समारंभाचे आठवणीत राहील असे आयोजन करू, अशी साद त्यांनी माजी विद्यार्थ्यांना घातली.
ए.के. गांधी यांनी शाळेचा गौरवशाली इतिहास थोडक्यात मांडला. अनेक दिग्गजांना घडविणारी ही शाळा आहे. नितीन गडकरीही त्यापैकीच एक आहेत. त्यांचा सर्वांनाच अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
वर्गात डेस्कवर बसले गडकरी
ज्या दहावी ‘ब’ च्या वर्गाखोलीतून त्यांंनी शालेय जीवनातील शेवटचे वर्ष पार केले त्या वर्गखोलीलाही त्यांनी भेट दिली. या वर्गखोलीला आधीच सजवून ठेवण्यात आले होते. अनेक जुने वर्गमित्रही यावेळी हजर होते. आपल्या शिक्षकांना चरणस्पर्श करून ते काही काळ या वर्गखोलीत विसावले. डेस्कवर बसण्याचा आनंदही त्यांनी घेतला. जुन्या वर्गमित्रांशी मनमोक ळ्या गप्पा करीत त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी आणि छायाचित्रेही काढून घेतली.
आठवणी आणि संवाद
समारंभादरम्यान अनेक माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी जाहीर संवाद साधला. यातून अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मुख्याध्यापक दवंडे सरांनी ‘देव नाही देव्हाऱ्यात’ या नाटकाचे आयोजन करून शाळेच्या बांधकामासाठी जिद्दीने पैसा उभारल्याची आठवण गडकरींनी सांगितली. पूर्वी खेळण्यासाठी मैदान नसल्याने रेशीमबाग मैदानावर वर्गमित्रांसह ते क्रि केट खेळायचे. मैदानावरच माणसे घाण करायची. बॉल दूर गेला की त्यावरूनच धावत जावे लागायचे; शेजारच्या नळावर सारेजण पाय धुवायचे, ही आठवण सांगताच एकच हंशा पिकला. डॉ. भाऊ काणे, विश्राम जामदार, सुभाष मंडलेकर, अंजली भाईक, शिल्पा चितळे, श्याम पराते आदी माजी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्याशी जाहीर संवाद साधला. संचालनकर्त्यांनीही अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.