जिल्हा परिषदेच्या ७४ हजार विद्यार्थ्यांना वर्गोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:07 AM2021-04-15T04:07:01+5:302021-04-15T04:07:01+5:30
नागपूर : सरकारने कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा लाभ नागपूर जिल्हा परिषदेच्या ७४ हजार ...
नागपूर : सरकारने कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा लाभ नागपूर जिल्हा परिषदेच्या ७४ हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. परीक्षा न देता यंदाही हे विद्यार्थी पुढच्या वर्गात प्रवेशित होणार आहेत. काही खासगी संस्थांनी परीक्षेची औपचारिकता पूर्ण करण्याची तयारी दर्शविली आहे. व्हॉट्स अॅपवर पेपर पाठविण्यात येत असून, घरी बसून पेपर सोडवा व शाळेत जमा करा, अशा सूचना दिल्या गेल्या आहे.
महाराष्ट्रात मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. मागच्यावर्षीही लॉकडाऊन लागल्यानंतर अनेक शाळांनी परीक्षा घेतल्या नाहीत. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले, पण शाळा उघडल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला. परंतु ऑनलाईन शिक्षणासाठी अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांजवळ अॅन्ड्रॉईड मोबाईल, लॅपटॉपची सुविधा नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहिले. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७० टक्के आहे. आता विनापरीक्षा विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या १५११ शाळा आहेत. यात ७४ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सरकारच्या वर्गोन्नतीच्या निर्णयाचा या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
- खासगी शाळांचे परीक्षेचे नियोजन
सरकारने परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची घोषणा केली आहे. परंतु खासगी शिक्षण संस्था परीक्षा घेण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही शाळांनी परीक्षेचे टाईमटेबल जारी केले आहे. फी वसुली करण्यासाठी हा फंडा वापरला जात असल्याचे पालक संघटनांचे म्हणणे आहे. व्हॉट्स अॅपवर पेपर पाठवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन करण्याला काहीच अर्थ नाही, असे पालकांचे म्हणणे आहे.
- शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणार आहोत.
- चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, जि. प. नागपूर