लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘ब्रह्मनाद’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खडसे बंधुंनी केलेले शहनाई वादन आणि मध्य प्रदेशातील देवास येथील पंडित भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन यांच्यामुळे कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर गेला. रसिकांना नाद व स्वरांची एक वेगळी अनुभूती देणारी ही मैफल ठरली.दक्षिम मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ.दीपक खिरवडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी उपसंचालक मोहन पारखी, कार्यक्रम अधिकारी दीपक कुलकर्णी, श्रीकांत देसाई प्रामुख्याने उपस्थित होते. विज्ञानेश्वर खडसे व राजेश खडसे या दोन्ही कलाकारांनी ‘राग तोडी’ पासून शहनाईवादन सुरू केले. त्यानंतर एकाहून एक सुरेल सादरीकरण करत ‘पूर्वी धून’ने वादनाचा समारोप केला. त्यांची साथसंगत करणाऱ्यांमध्ये राजेश खडसे (तबला), निखील खडसे (शहनाई), पलाश खडसे (हार्मोनियम) यांचा समावेश होता.पंडित भुवनेश कोमकली यांनी ‘राग अहीर भैरव’ने सादरीकरणाची सुरुवात केली. ‘ये म्हारा रसिया आओ जी’, ‘बहुत दिन बीते’, ‘कल न वक्त मोहे निसदिन’, ‘कवन बटरिया गइलों माई’, ‘वेग बेग आओ मंदर’ यांची प्रस्तुती केली. सोबतच ‘कुदरत की गति न्यारी’, ‘हिरन समझ बुझ बन चरना’. ‘सुनता है गुरु ग्यानी’ यासारख्या भजनांच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय करून टाकले. त्यांना अभिषेक शिनकर (संवादिनी), पवन सेम (तबला) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.
शास्त्रीय स्वरांच्या मैफलीने सजला ‘ब्रह्मनाद’ : खडसे बंधुंनी केले शहनाई वादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:12 PM
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘ब्रह्मनाद’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खडसे बंधुंनी केलेले शहनाई वादन आणि मध्य प्रदेशातील देवास येथील पंडित भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन यांच्यामुळे कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर गेला. रसिकांना नाद व स्वरांची एक वेगळी अनुभूती देणारी ही मैफल ठरली.
ठळक मुद्दे पंडित भुवनेश कोमकलींच्या गायनाने श्रोता मंत्रमुग्ध