‘स्वच्छ भारत’ केवळ घोषणाच? नागपूर रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांकडून नियमांची ऐशीतैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 10:31 AM2018-04-06T10:31:48+5:302018-04-06T10:31:56+5:30
भाजपाच्या नेत्यांकडून नियमांचे पालन, ‘स्वच्छ भारत’ यासंदर्भात मोठमोठे बौद्धिक देण्यात येते. विविध कार्यक्रम आयोजित करून त्याचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आज अजनी रेल्वेस्थानकात दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाच्या नेत्यांकडून नियमांचे पालन, ‘स्वच्छ भारत’ यासंदर्भात मोठमोठे बौद्धिक देण्यात येते. विविध कार्यक्रम आयोजित करून त्याचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आज अजनी रेल्वेस्थानकात दिसून आले. ‘सोशल मीडिया’वर ‘बौद्धिक’ देण्यात आघाडीवर असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय रेल्वे
च्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे आमदार, वरिष्ठ पदाधिकारी यांच्या समोर हा प्रकार सुरू असताना कुणीही त्यांना थांबविण्याची तसदीदेखील घेतली नाही.
सकाळी ८.१५ वाजता नियोजित रेल्वेगाडी निघून गेल्यामुळे मुंबई येथे पक्षाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला जाणारे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते पाच तासांहून अधिक वेळ अजनी रेल्वेस्थानकावर अडकून पडले होते. या कालावधीत कार्यकर्त्यांकडून शिस्तीची अपेक्षा होती. परंतु साधे कचरापेटीत कचरा टाकण्याचे सौजन्यदेखील काही कार्यकर्त्यांनी दाखविले नाही. रेल्वेकडून विविध माध्यमातून रेल्वेट्रॅक ओलांडणे नियमबाह्य आहे, याची जागृती करण्यात येते. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना साधा रेल्वेपूल ओलांडून जाणे जीवावर येत होते व अनेक कार्यकर्ते थेट प्लॅटफॉर्मवरुन रेल्वेरुळावरच जाताना दिसून आले. एका प्लॅटफॉर्मवरुन दुसरीकडे पाण्याच्या पाऊचच्या पिशव्या पोहोचविताना तर पूर्ण ‘ट्रॅक’वर डझनाहून अधिक कार्यकर्त्यांनी शृंखलाच तयार केली होती.
‘आरपीएफ’च्या सूचनेकडे ‘भाजयुमो’ कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष
४रेल्वेरुळ ओलांडणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना ‘आरपीएफ’तर्फे असे न करण्याची सूचना करण्यात आली. मात्र काही कार्यकर्त्यांनी ‘तुम अपना काम करो’ असे म्हणत या सूचनेकडे दुर्लक्ष केले. यावेळी ‘भाजयुमो’च्या शहर अध्यक्ष शिवानी दाणी यांनीदेखील याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांना नियम पाळण्याबाबत आग्रह केला नाही.
प्लॅटफॉर्मवर कचराच कचरा
स्वच्छ भारत मोहिम देशभरात राबविण्यात येत असून नागपुरातदेखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यात पुढाकार घेतला होता. मात्र त्यांच्याकडून अजनी रेल्वेस्थानकावर प्रत्यक्षात कृती मात्र दिसून आली नाही. जागोजागी पिण्याच्या पाण्याचे पाऊच, चिप्स-बिस्किटांची रिकामी पाकिटे पडली होती. विशेष रेल्वेगाडीवर पक्षाचे स्टीकर्स व बॅनर्स लावण्यात आले होते. त्याचा कचरादेखील प्लॅटफॉमवरच फेकण्यात आला होता.