नागपूर-पुणे धावत्या लक्झरी बसमध्ये युवतीवर क्लिनरनेच केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 05:52 AM2021-01-12T05:52:16+5:302021-01-12T05:52:27+5:30
गोंदिया जिल्ह्यातील एका गावामध्ये वास्तव्यास असलेली २१ वर्षीय युवती पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. ती बहिणीच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम : नागपूर-पुणे मार्गावर धावणाऱ्या खासगी बसमध्ये (स्लीपर कोच) एका २१ वर्षीय युवतीवर बसच्या क्लिनरनेच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. ही घटना मालेगाव पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या महामार्गावर ६ जानेवारीला मध्यरात्री दरम्यान घडली.
गोंदिया जिल्ह्यातील एका गावामध्ये वास्तव्यास असलेली २१ वर्षीय युवती पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. ती बहिणीच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी आली होती. लग्न आटोपून ५ जानेवारीला दुपारी ४:३० वाजता नागपूर येथून गुडविल ट्रॅव्हल्सने ती पुण्याला परत निघाली होती. प्रवासादरम्यान बसचा क्लिनर समीर देवकर (२५, रा. सीताबर्डी, नागपूर) हा पीडित युवतीच्या शेजारी जाऊन झोपला. युवतीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिचे तोंड दाबून चाकूचा धाक दाखविला. घाबरलेल्या युवतीवर आरोपीने दोनवेळा बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ६ जानेवारीला ही बस सकाळी पुणे येथे पोहोचल्यावर पीडित युवतीने तिच्या एका मित्राला फोन करून आपबिती सांगितली. त्यानंतर युवती आणि तिच्या मित्राने पुणे ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. पोलिसांनी समीरविरुद्ध कलम ३७६ (२) (एन) ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनास्थळ हे मालेगाव बायपास (जि. वाशिम) असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण मालेगाव पोलीस ठाण्याला वर्ग केले.