ढगांचा ढोल वाजला, आकाशातून पाऊस बरसला; विदर्भात दमदार हजेरी : नागपुरात सरीवर सरी
By निशांत वानखेडे | Published: September 21, 2023 07:13 PM2023-09-21T19:13:31+5:302023-09-21T19:14:42+5:30
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत चंद्रपूर व नागपूरसह विदर्भात सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग चालविली आहे.
नागपूर : हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत चंद्रपूर व नागपूरसह विदर्भात सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग चालविली आहे. चंद्रपूर शहरात अक्षरश: पावसाने धुमाकूळ घातला असून विक्रमी १५० मि.मी. ची नोंद झाली. दुसरीकडे नागपूर, गडचिरोली, वर्धा आदी जिल्ह्यात मध्यम पावसाच्या सरीवर सरी बरसल्या. पुढचे दोन दिवस अशाच दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
चंद्रपूर शहरात सकाळपासूनच पावसाचा खेळ सुरू झाला. दुपारी थोडी उसंत घेत पुन्हा धुमशान सुरू झाले. यामुळे सायंकाळपर्यंत तब्बल १५० मि.मी. पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे तापमान तब्बल ७ अंशाने खाली कोसळले. गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू असून सकाळच्या ४३ मि.मी. नंतर सायंकाळपर्यंत ५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. नागपुरात सकाळपासून रिमझिम सुरू होती पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढला व दमदार सरी बरसल्या.
नागपुरात ३.६ अंशाने पारा घसरला. पावसाची मोठी तुट असलेल्या अकोला व अमरावतीतही गुरुवारी गणपती पावला व जोरदार सरी बरसल्या. दोन्ही शहरात अनुक्रमे २७ व ४७ मि.मी. पाऊस नोंदविला गेला. भंडारा, गोंदिया, वर्धा व यवतमाळमध्येही आनंदसरींनी जनमानस सुखावला. संपूर्ण विदर्भात आतापर्यंत ८३७.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
आज सध्या मान्सूनचा आस सरासरी जागेपासून दक्षिणेला असुन बंगालच्या उपसागरातील साडेसात किमी. उंचीचे कमी दाब क्षेत्र सध्या झारखंड व सभोंवताल परिसरात स्थित आहे. त्यामुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवस म्हणजे शनिवारपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात मात्र जोरदार पावसाची शक्यता जाणवते. चार दिवसाच्या उघडीपीमुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीलाही या पावसाचा लाभ होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र पावसाची तुट भरून निघण्यासाठी आणखी काही दिवस जोरदार बरसण्याची गरज आहे.