ढग रुसले, ऑगस्टमध्ये फक्त २५ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:13 AM2021-08-17T04:13:20+5:302021-08-17T04:13:20+5:30
नागपूर : जून-जुलैमध्ये मान्सूनचे ढग नागपूरवर मेहरबान दिसले. मात्र ऑगस्ट महिन्यात असे काही रुसले की मागील १६ दिवसांत फक्त ...
नागपूर : जून-जुलैमध्ये मान्सूनचे ढग नागपूरवर मेहरबान दिसले. मात्र ऑगस्ट महिन्यात असे काही रुसले की मागील १६ दिवसांत फक्त २५ मिमी पावसाची नोंद झाली. साधारणत: ऑॅगस्ट महिन्यात ११८.५ मिमी पावसाची नोंद होते. पण सरासरी पावसाच्या तुलनेत २१ टक्केच पाऊस पडला. असे असले तरी जून-जुलैमधील पुरेशा पावसामुळे आजही नागपुरातील पाऊस सरासरीपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार, १ जून ते १६ ऑगस्ट या दरम्यान नागपूर शहरात ६१७.६ मिमी पावसाची नोंद झाली. सामान्य परिस्थितीत हा पाऊस सरासरी ५९६.२ मिमी असतो. आतापर्यंत १०३.२ टक्के पाऊस झाला आहे. तर मान्सूनचा पाऊस ६५ टक्के पडला आहे. ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात मान्सूनचे ढग अधिक सक्रिय होतील, असा अंदाज लावला जात आहे. नागपूर शहरात मान्सूनदरम्यान साधारणत: ९५१.४ मिमी पाऊस पडतो.
उल्लेखनीय असे की, जून आणि जुलै महिन्यात नागपूर शहरात सरासरी ४७७.७ पाऊस पडतो. मात्र या वेळी मान्सूनचे ढग अधिक मेहरबान झाल्याने ५९२.६ मिमी पाऊस पडला. तो सरासरी पावसापेक्षा २४ टक्के अधिक होता. मात्र ऑगस्ट महिन्यात ढग रुसल्याने स्थिती चिंताजनक झाली आहे.
...
गतवर्षीपासून स्थिती घसरली
शहरात मागील वर्षी १ जून ते १६ ऑगस्ट या काळात ७२८.८ मिमी पाऊस नोंदविला गेला. तो सामान्यापेक्षा २२.२ टक्के अधिक होता. मात्र या वर्षी ऑगस्ट महिन्यात पाऊस न पडल्याने पावसाचा बॅकलॉग वाढल्याचा अंदाज आहे.
...
परिस्थिती अनुकूल बनतेय
मागील २४ तासांपासून पावसाची परिस्थिती अनुकूल बनत आहे. हवामान खात्याच्या मते, आकाशात ढग दाटलेले राहतील. एक-दोन ठिकाणी जोराच्या पावसाचा अंदाज आहे. रविवारी सायंकाळी आणि सोमवारी दुपारी चांगला पाऊस झाला. सोमवारी रात्री ८ वाजतानंतर पावसाला सुरुवात झाली. ढगाळलेल्या वातावरणामुळे वातावरणात दमटपणाही जाणवत होता.