लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय पक्षांनी आंदोलने न करण्याचे आवाहन केले होते. भाजपने याला प्रतिसाद देत २४ तारखेचे जेलभरो आंदोलन रद्द केले. मात्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावत इंधन दरवाढीविरोधात सोमवारी आंदोलन केले. आश्चर्याची बाब म्हणजे यातील बहुतांश आंदोलकांनी मास्कदेखील लावले नव्हते.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशोक चौकात पेट्रोल-डिझेल दरवाढ तसेच गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांच्या विरोधात आंदोलन केले. दुपारी ४ वाजता झालेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याला फाशी देऊन केंद्र सरकारची निंदा करण्यात आली. मात्र यातील बहुतांश कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हते. शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेदेखील उल्लंघन करण्यात आले. शहर उपाध्यक्ष हेमंत कातुरे व महासचिव नयन तरवटकर यांच्यासह आकाश गुजर, वसीम शेख, सागर चव्हाण, स्वप्निल ढोके, रोहन कुलकर्णी, गणेश शर्मा, कुणाल मौंदेकर, माधव जुगेल, प्रणीत बिसने, कुणाल खडगी, मुदस्सीर अहमद, नीलेश लुटे, अमन लुटे, रामुल खैरकर, सार्थक चिचमलकर, अतुल मेश्राम, आदित्य वैद्य, अमोल पाटील, चेतन कावले, विजय मिश्रा, आयुष राऊत, शांतनू जुगांदे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
घोडा, बैलगाडी घेऊन पोहोचले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
दुसरीकडे इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीदेखील आंदोलन केले. संविधान चौकात झालेल्या आंदोलनात कार्यकर्ते घोडा व बैलगाडी घेऊन पोहोचले. पक्षाच्या वाहतूक सेलच्या अंतर्गत झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर सायकल, घोडा व पेट्रोल नसलेल्या दुचाकी चालविल्या. बहुतांश कार्यकर्ते मास्क घालून नव्हते व फिजिकल डिस्टन्सिंगदेखील पाळण्यात आले नाही. याच पक्षाचे नेते गृहमंत्री असताना शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनीदेखील आवाहन पाळण्याची तसदी घेतली नाही. यावेळी श्रीकांत शिवणकर, अशोक काटले, विशाल खांडेकर, चरणजीत सिंह चौधरी, राजेश तिवारी, मेहबूब पठाण, निसार अली, कुलदीप शर्मा, अमित शुक्ला, सचिन शाहू, प्रशांत तिजारे, नरेंद्र बोरकर, अक्षय माधवी, निखिल ठक्कर, अक्षय पाराजी, विकी मून, प्रीतम चक्रवर्ती, मोहसिन शेख, इंदर सैनी, सय्यद अली, अंगद यादव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.