जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवडणूक सुधारणांसाठी भारत निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार

By आनंद डेकाटे | Published: January 25, 2024 03:55 PM2024-01-25T15:55:28+5:302024-01-25T15:55:48+5:30

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने दिल्लीतील मानेकशॉ सभागृहात आयोजित १४ व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Collector Dr Vipin Itankar felicitated by the President; Election Commission of India National Award for Electoral Reforms | जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवडणूक सुधारणांसाठी भारत निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवडणूक सुधारणांसाठी भारत निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार

नागपूर : निवडणूक सुधारणासंदर्भात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते भारत निवडणूक आयोगाचा 'बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड २०२३ ' हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने दिल्लीतील मानेकशॉ सभागृहात आयोजित १४ व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल यावेळी मंचावर उपस्थित होते.

निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी 'मिशन युवा ' अभियान राबविले होते. या अभियाना अंतर्गत त्यांनी १५ जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला लक्षात घेऊन ७५ हजार युवा मतदाराची नोंदणी करण्याचे अभियान जिल्ह्यामध्ये सुरु करण्यात आले होते. यात जानेवारी २०२४ अखेर १७ ते १९ वयोगटातील ८८६०९ नव युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली असून अद्याप ही मतदार नोंदणी सुरू आहे. या अभियानाची नोंद भारत निवडणूक आयोगाने घेतली आहे. स्वतः उद्दिष्ट ठरवून ते पूर्ण केल्याचे विशेष कौतुक आयोगाने केले आहे.

देशभरातून निवडणूक सुधारणा करणाऱ्या ७ आयएएस -आयपीएस अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक सुधारणांसाठी एकूण ७ अधिकाऱ्यांना पुरस्कृत केले असून ४ विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक खर्चाच्या संदर्भातील उत्कृष्ट कामाच्या संदर्भात कर्नाटकच्या श्रीमती सीखा या आयएएस अधिकाऱ्यांना पुरस्कार मिळाला आहे. तर उत्कृष्ट कार्य करणारे निवडणूक राज्य म्हणून छत्तीसगड राज्याचा सन्मान करण्यात आला आहे.
 

Web Title: Collector Dr Vipin Itankar felicitated by the President; Election Commission of India National Award for Electoral Reforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.