लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याकरिता विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनमधील २८ कंपन्या एकूण ३ कोटी २९ लाख रुपये देणार आहेत. याशिवाय, २९ कंपन्या आर्थिक योगदान देण्यास तयार असून, त्यांनी रक्कम कळवलेली नाही. विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी यांनी गुरुवारी या सर्व कंपन्यांची यादी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केली.
यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिला होता. न्यायालयाने सदर यादी रेकॉर्डवर घेतली. तसेच, ही यादी नागपूर विभागीय आयुक्तांनाही देण्याचे निर्देश असोसिएशनला दिले. विभागीय आयुक्तांनी यादी मिळाल्यानंतर संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून रक्कम मिळविण्यासाठी पुढील कारवाई करावी असेदेखील न्यायालयाने सांगितले. याशिवाय, महावितरण कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांना सीएसआर निधीतून १ कोटी १० लाख रुपये दिले आहेत. त्यातून मेडिकलकरिता २० व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले आहेत. मौदा येथील एनटीपीसी कंपनीही सीएसआर निधी देण्यास तयार असून, त्यांनी निधी कशाकरिता द्यायचा याची माहिती मागितली आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता कंपनीने अधिक माहितीची प्रतीक्षा न करता योगदान देण्यावर तातडीने निर्णय घ्यावा, असे सांगितले.