करुणेचे वैश्विकीकरण व्हावे : सत्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 01:01 AM2020-05-21T01:01:38+5:302020-05-21T01:05:32+5:30
मुले स्वत:वर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनादेखील क्षमा करतात. त्यांच्यासाठी संवेदनेचे द्वार उघडा. त्याच अनुषंगाने ‘करुणा भावनेचे वैश्विकीकरण’ अत्यंत गरजेचे असल्याची भावना प्रख्यात बाल अधिकारांचे चिंतक व नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुले स्वत:वर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनादेखील क्षमा करतात. त्यांच्यासाठी संवेदनेचे द्वार उघडा. त्याच अनुषंगाने ‘करुणा भावनेचे वैश्विकीकरण’ अत्यंत गरजेचे असल्याची भावना प्रख्यात बाल अधिकारांचे चिंतक व नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.
प्रभा खेतान फाऊंडेशनच्या वतीने त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. ही मुलाखत वर्तमानातील प्रख्यात कवी यतिंद्र मिश्र यांनी घेतली. सत्यार्थी यांनी बालकांच्या भावनेवर आपले विचार व्यक्त केले. एखाद्या निरागस मुलीला देहव्यापारात ढकलल्या जाणे मला विचलित करते. मनातील त्याच हलकल्लोळातून आपल्या काही सहकाऱ्यांसह १९८१ मध्ये ‘बालपण वाचवा आंदोलन’ सुरू केले होते. त्याच अनुषंगाने बालमजुरी, शोषण, गरिबीच्या बाहेर मुलांना काढणे व बाल अधिकारांकरिता कायदेशीर लढाईकरिता पत्नी सुमेधाचे दागिनेही विकावे लागल्याचे सत्यार्थी म्हणाले. सत्यार्थी यांच्या चमूने आजतागायत ९० हजार मुलांना नरकयुक्त जीवनातून यशस्वीरीत्या बाहेर काढले आहे. ते म्हणतात, ‘अन्याय-अत्याचाराविरोधात क्रोध निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच परिवर्तन होईल.’ पूर्वाश्रमीचे कैलाश शर्मा यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडला आणि त्यांनी कैलाश सत्यार्थी हे नामकरण करवून घेतले. सत्यार्थी वर्तमानात संयुक्त राष्ट्रसंघ आणि जी-२० देशांमधील वंचितांकरिता निधी एकत्रित करण्याच्या अभियानात सहभागी आहेत. या कार्यक्रमाचे सहआयोजक ‘अहसास वुमन’ होते तर ‘लोकमत’ मीडिया पार्टनर होते. श्री सिमेंटकडून या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. ‘अहसास वुमन’च्या प्रणिम बब्बर यांनी सर्वांचे स्वागत केले.