नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे अपघातात उजवा पाय गमावलेल्या महिलेला नवीन नियमानुसार ४ लाख ८० हजार रुपये भरपाई मंजूर केली. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी महिलेला हा दिलासा दिला.
सुमन दुधाडे (३८) असे अपघातग्रस्त महिलेचे नाव असून, ती खडकी (जि. नांदेड) येथील रहिवासी आहे. त्या ८ एप्रिल २००७ रोजी मध्यरात्री खडकी बाजार रेल्वेस्थानक येथे अदिलाबाद-नांदेड रेल्वेतून खाली उतरत असताना रेल्वे अचानक सुरू झाली. त्यामुळे त्या खाली पडल्या व त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून तुटला.
त्यानंतर १२ सप्टेंबर २००८ रोजी रेल्वे न्यायाधीकरणने त्यांना जुन्या नियमानुसार २ लाख ४० हजार रुपये भरपाई मंजूर केली होती. त्या निर्णयाविरुद्ध दक्षिण मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. दुधाडे यांच्या चुकीमुळे ही घटना घडली. परिणामी, त्यांना भरपाई दिली जाऊ शकत नाही, असे रेल्वेचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता, रेल्वेचे अपील फेटाळून दुधाडे यांना सुधारित भरपाई मंजूर केली.