प्रसुती रजा नाकारल्याबद्दल आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 07:45 PM2020-07-07T19:45:16+5:302020-07-07T19:55:43+5:30
तुकाराम मुंढे यांनी माझे प्रसूती हक्क नाकारले. कोविड-१९ चा संसर्ग वाढल्याने नागपूर शहर ‘रेड झोन’मध्ये असताना मी ‘ग्रीन झोन’मध्ये असलेल्या भंडारा येथे माझ्या लहान मुलासह वास्तव्यास होते. माझी प्रसूती रजा नाकारण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रसूती काळातील महिला कर्मचाऱ्यांना असलेले कायदेशीर हक्क नाकारून अपमानजनक वागणूक व मानसिक छळ करण्यात आल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या महिला सेक्रेटरी यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.
तुकाराम मुंढे यांनी माझे प्रसूती हक्क नाकारले. कोविड-१९ चा संसर्ग वाढल्याने नागपूर शहर ‘रेड झोन’मध्ये असताना मी ‘ग्रीन झोन’मध्ये असलेल्या भंडारा येथे माझ्या लहान मुलासह वास्तव्यास होते. माझी प्रसूती रजा नाकारण्यात आली. तसेच वर्क फ्रॉम होमची सुविधाही नाकारली. आयुक्तांची भेटीची वेळ घेऊन या संदर्भात चर्चेसाठी मनपा मुख्यालयात पोहोचले. परंतु मला तीन तास कक्षाबाहेर उभे ठेवण्यात आले. त्यानंतर मी त्यांच्या कक्षात गेले असता मला तुमच्याशी काही बोलायचे नाही, असे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. एवढेच नव्हे तर मला धमकी दिली. मला नोकरीवरून काढून टाकण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही पाठवली.
या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला अपमानजनक वागणूक देऊन मानसिक छळ केल्याने महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संबंधित महिला अधिकारी यांनी दिली.
याप्रकरण़ी महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांना सात दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे. स्पष्टीकरणानंतर आयोगाचे समाधान न झाल्यास आयुक्तांवर या प्रकरणात कारवाई होते का याकडे महापालिका वर्तुळासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.