लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आमदार निवासाच्या इमारत क्रमांक २ मधील चौथ्या माळ्यावर रविवारचा दिवस पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण एकाच माळ्यावर होते. धक्कादायक म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांची वऱ्हांड्यात ये-जा सुरू होती. त्यांच्या कक्षात इतरांचे येणे-जाणे सुरू होते. त्यामुळे चाचणी निगेटिव्ह आलेल्या संशयितांच्या मनात भीतीचे वातावरण होते, अशी माहिती एका संशयिताने ‘लोकमत’ला फोनवरून दिली. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या एम्प्रेस सिटी येथील एका रहिवाशाचे नमुने ३० मार्च रोजी पॉॅॅझिटिव्ह आले. एम्प्रेस सिटीसह शेजारच्या इस्कॉन टेम्पलमधील १५ पुरुषांना नमुने तपासून सहा तासात सोडले जाईल, असे सांगून महापालिकेच्या चमूने आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षातील इमारत क्रमांक २ मध्ये दाखल केले. येथे आल्यावर त्यांना १४ दिवस थांबावे लागेल असे सांगण्यात आले. आपल्यामुळे आजार पसरू नये म्हणून या लोकांनी सहकार्य केले. यातील काही लोकांना याच इमारतीच्या चवथ्या मजल्यावरील कक्षात ठेवले. सर्वांची दोन वेळा नमुन्यांची तपासणी होऊन अहवाल निगेटिव्हही आला. रविवारी १४ दिवस पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात येणार होते. परंतु चवथ्या माळ्यावरील कक्ष क्रमांक ४४६ व ४४९ कक्षातील चौघे पॉझिटिव्ह आले. यामुळे निगेटिव्ह चाचणी आलेल्यांना थांबवून ठेवण्यात आले. सकाळी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण चहापाण्यासाठी वऱ्हांड्यात फिरत होते. रात्री महापालिकेची चमू येऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान निगेटिव्ह आलेल्यांना संसर्गाचा धोका वाढला होता.मनपामध्ये नियोजनाचा अभावसंशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. परंतु ज्यांचे नमुनेच तपासले गेले नाहीत त्यांना आणि ज्यांचे नमुने निगेटिव्ह आले त्यांना एकाच इमारतीत एकाच माळ्यावर ठेवले जात आहे. येथील क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या लोकांच्या मते, निगेटिव्ह लोकांना व संशयितांना किमान वेगवेगळ्या माळ्यावर किंवा वेगळ्या इमारतीत ठेवायला हवे. पॉझिटिव्ह आलेल्यांना तातडीने रुग्णालयात हलवायला हवे. परंतु यात होत असलेला उशीर व मनपामध्ये नियोजन नसल्याने संसर्ग वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.
आमदार निवासातील संशयितांची तक्रार : एकाच माळ्यावर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 9:07 PM
आमदार निवासाच्या इमारत क्रमांक २ मधील चौथ्या माळ्यावर रविवारचा दिवस पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण एकाच माळ्यावर होते. धक्कादायक म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांची वऱ्हांड्यात ये-जा सुरू होती.
ठळक मुद्देनिगेटिव्ह रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण