नागपूर शहरातील विकास कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:00 PM2019-07-08T22:00:58+5:302019-07-08T22:02:14+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केल्या.नागपूर महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिका कामाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केल्या.नागपूर महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिका कामाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यात नावीन्यपूर्ण योजना, कौशल्य विकास योजना, पाणीपुरवठा, दलित वस्ती सुधार योजना यासह विविध योजनांचा समावेश होता. जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. महापालिका क्षेत्रात एकूण सर्व कामांचा सद्य:स्थितीचा अहवाल येत्या आठ दिवसात सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यात प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर अधिकाऱ्यांनी जाऊन निरीक्षण करावे. तसेच कामे पूर्ण किंवा अपूर्ण याबाबतचा स्पष्ट अहवाल तयार करावा. अपूर्ण असलेली कामे किती दिवसात पूर्ण करण्यात येतील, याबाबतची माहिती सादर करावी. प्रत्येक कामाचे छायाचित्र व चलचित्रीकरणासह माहिती द्यावी, अशा विविध सूचना त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीत अभियंता वासनिक, शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर, नगररचनेचे सहायक संचालक गावंडे, हनुमाननगर झोनचे अभियंता बाराहाते, पाणीपुरवठा अभियंता गणवीर, बॅनर्जी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
अखेर कुणासाठी बैठक
जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीत ना महापौर आल्या ना आमदार आलेत. रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी मात्र उपस्थित होते. त्यांचा मनपा क्षेत्रात सुरू असलेल्या कामांशी कुठलाही संबंध नव्हता. तरीही ते आलेत. परंतु शहरातील एकही आमदार बैठकीला आले नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी अधिकाºयांनाच प्रश्न केला की, ही बैठक कुणासाठी बोलावण्यात आली आहे. आमदार, महापौर, पदाधिकारी कुणीही उपस्थित नहीत तर मग चर्चा कुणासोबत करणार आणि समस्येचे निराकरण कसे होणार. ही बैठक पुन्हा बोलावण्यात यावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती आहे.