लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय वायुदलाच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. वायुदलाची जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील मोठा अडथळा दूर झाला आहे.वायुदलाला मिळाली ३७७.५९ हेक्टर जमीनभारतीय वायुदलाकडे असलेली २१९.५८ हेक्टर जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या ताब्यात देण्यात आली. त्याऐवजी भारतीय वायुदलाला सलग ३७७.५९ हेक्टर जमीन मिहानतर्फे देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व भारतीय वायुदलाचे स्टेशन कमांडंट व ग्रुप कॅप्टन ए.के. चौरसिया यांनी जमीन हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज सह्या करुन प्रक्रिया पूर्ण केली. भारतीय वायुदलाच्या जमिनीचे संपूर्ण दस्तऐवज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपविण्यात आले.यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा मिहान प्रकल्पाचे पुनर्वसन अधिकारी प्रकाश पाटील, मिहानचे तांत्रिक सल्लागार एस.व्ही. चहांदे, मुख्य अभियंता एस.के. चॅटर्जी, विंग कमांडर मनोज महेता, स्क्वॉड्रन लिडर काळे, एस. सिंग, सी.पी. सिंग तसेच इस्टेट आॅफिसर निखार, जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख) सूर्यकांत मोरे, नगरभूमापन अधिकारी भूषण मोहिते उपस्थित होते.१६ वर्षांची प्रतीक्षा पूर्णमिहान प्रकल्पाची २००२ मध्ये घोषणा झाली. त्यावेळी भारतीय वायुदलाकडील २७८ हेक्टर जमीन मिहान प्रकल्पाकरिता हस्तांतरित करुन त्याऐवजी भारतीय वायुदलाला सलग ४०० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमिनीच्या हस्तांतरणासंदर्भात सातत्याने संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. तसेच केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत १७ मे २०१५ रोजी जमीन हस्तांतरणाबाबत चर्चा करून दोन टप्प्यामध्ये जमिनीचे हस्तांतरण करण्याचे निश्चित करण्यात आले होते.मे २०१६ पासून भारतीय वायुदल व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या जमिनीची मोजणी तसेच आखणी इत्यादी बाबींची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन ही प्रक्रिया पूर्ण केली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मिहान प्रकल्पासाठी भारतीय हवाई दलाची जमीन उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
नागपुरातील मिहान प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 9:01 PM
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय वायुदलाच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. वायुदलाची जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
ठळक मुद्देभारतीय वायुदल जमिनीचे हस्तांतरण : वायुदलाची २१९.५८ हेक्टर जमीन एमएडीसीकडे