लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : विद्यार्थ्यांना घडविणे शिक्षकांचे कर्तव्य आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास हाेऊ शकताे. त्यामुळे शिक्षकांनी अध्ययन व अध्यापनात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा व एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांनी रामटेक शहरात आयाेजित शिक्षकांच्या कार्यशाळेत केले. त्यांनी उपक्रमशील शिक्षकांचे काैतुकही केले.
शिक्षकांच्या उपक्रमशीलतेला चालना देण्यासाठी कार्यशाळेचे आयाेजन केले हाेते. त्यात रामटेक विभागातील बहुतांश शिक्षक उपस्थित हाेते. कार्यशाळेत मीना शामकुवर,गणेश बेलखुडे, खुशाल कापसे, ओंकार पाटील, मच्छिंद्र कांबळे, आनंद नंदनवार या शिक्षकांनी ‘पीपीटी’द्वारे उपक्रमांचे सादरीकरण केले. या कार्यशाळेचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने युट्युबवर लाईव्ह प्रसारण करण्यात आले. योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते वेध प्रतिष्ठानच्या ‘अक्षर वेध’ पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
याप्रसंगी राज्य विज्ञान संस्था नागपूरचे संचालक रवींद्र रमतकार, रामटेकचे खंडविकास अधिकारी प्रदीप बमनोटे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या हर्षलता बुराडे, रामटेकच्या गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने, पारशिवनीचे कैलास लोखंडे यांच्यासह तिन्ही तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक व शिक्षक उपस्थित होते. प्राचार्या हर्षलता बुराडे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयाेजनाचा हेतू विशद केला. संचालन केंद्रप्रमुख भूपेश चव्हाण यांनी केले तर गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी रामनाथ धुर्वे, विनोद शेंडे, धीरज राऊत, तेजराम येनस्कर, पुरस्कारप्राप्त शिक्षक सचिन चव्हाण, सुधाकर कुमरे यांच्यासह शिक्षक व गटसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.