महामानवाच्या संकल्पनेतील ‘शांतिवन’ आकारास येतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:51 AM2018-04-14T00:51:21+5:302018-04-14T00:51:33+5:30
धम्माचा सर्वांगीण अभ्यास असलेले प्रशिक्षित उपासक तयार व्हावे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. या संकल्पनेच्या उद्देशाने काटोल रोडवरील चिचोली येथे साकारण्यात येत असलेला ‘शांतिवन’ प्रकल्प आता खऱ्या अर्थाने आकारास येऊ लागला आहे. या प्रकल्पातील ६० टक्के काम जवळपास पूर्ण झाले आहे.
आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्माचा सर्वांगीण अभ्यास असलेले प्रशिक्षित उपासक तयार व्हावे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. या संकल्पनेच्या उद्देशाने काटोल रोडवरील चिचोली येथे साकारण्यात येत असलेला ‘शांतिवन’ प्रकल्प आता खऱ्या अर्थाने आकारास येऊ लागला आहे. या प्रकल्पातील ६० टक्के काम जवळपास पूर्ण झाले आहे. इमारती उभ्या झाल्या आहे, परिणामी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वस्तूंच्या चिरकाल जतनासह त्यांच्या विचारांनाही आता गती मिळणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी प्रशिक्षित धम्मसेनानी तयार व्हावे असे विचार व्यक्त केले होते. धम्माचा सर्वागीण अभ्यास असलेले प्रशिक्षित उपासक समाजात तयार व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. ती पूर्ण करण्याच्या उद्देशाने डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी धम्मसेनानी वामनराव गोडबोले कामाला लागले. नव्हे तर आपल्या जीवनाचे ते ध्येय ठरविले. यासाठी त्यांना काटोल रोडवरील चिचोली या गावी एका महिलेने आपले शेत दान दिले. या जागेवरच त्यांनी हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारणासाठी महाविद्यालय उभारण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्याकडे महामानवाच्या अनेक वस्तूंही होत्या. डॉ. आंबेडकरांचे खासगी सचिव नानकचंद रत्तू यांनीही त्यांना बाबासाहेबांच्या अनेक वस्तू भेट दिल्या. माईसाहेबांनी त्यांना काही वस्तू भेट दिल्या अशा प्रकारे त्यांच्याकडे महामानवाच्या ऐतिहासिक वस्तंूचा मोठ्या प्रमाणावर संग्रह झाला. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले कपडे, कोट, टाय टोपी, जॅकेट, खुर्ची, यांच्यासह बुद्ध आणि त्यांचा धम्म व भारतीय राज्यघटनेचा मसुदा ज्या टाईपरायटवर सर्वप्रथम टाईप करण्यात आला होता, तो टाईपरायटर. ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यासाठी वापरण्यात आलेली बुद्ध मूर्ती आदींसह महामानवाच्या जीवनाशी संबंधित व त्यांनी प्रत्यक्ष वापरलेल्या वस्तूंचा यात समावेश आहे. आता या वस्तू कुठे ठेवायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला तेव्हा त्यांनी एक संग्रहालय उभारले. निधीअभावी त्यांना प्रशिक्षण इमारतीचे कामही पूर्ण करता आले नाही.
त्यांच्यानंतर संजय पाटील हे शांतिवन चिचोलीची देखभाल करू लागले. येथील संग्रहालय तसे लहान. शास्त्रोक्त पद्धतीने ते उभारण्यात न आल्याने महामानवाच्या वस्तू नष्ट होण्यास सुरुवात झाली. कपड्यांना वाळवी लागायला लागली. आता या वस्तू वाचविणे हेच एक मोठे आव्हान होते. यासाठी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी धावपळ केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. महामानवांच्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्या वस्तू अनेक वर्षे टिकून राहतील, यासाठी कामाला सुरुवात झाली. परंतु या वस्तू योग्य ठिकाणी राहाव्यात म्हणून संग्रहालयाची इमारतही तशीच बांधणे आवश्यक आहे. तेव्हा शासनाने या प्रकल्पाचे गांभीर्य ओळखले आणि विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत ४० कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर केला. यासोबतच पर्यटन विकासांतर्गत १७ कोटी रुपयाचा निधीही मंजूर केला. या निधीतून आता महामानवाच्या ऐतिहासिक वस्तूंंसाठी भव्य संग्रहालय, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मेडिटेशन सेंटर, उपासक गृह, बौद्ध धम्माचे शिक्षण देणारे प्रचारक विद्यालयाची इमारत, वसतिगृह आदी इमारती बांधल्या जात आहेत. १४ एप्रिल २०१९ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. इमारतीचे काम सुरू असले तरी शांतिवन चिचोलीमध्ये लहान मुलांसाठी संस्कार श्बििराचे काम सुरु झाले आहे. आजूबाजूच्या गावातील अनेक मुल येथील संस्कार शिबिराचा लाभ घेत आहेत.
८ महिन्यात ६० टक्के काम
शांतिवन चिचोलीचे क्युरेटर संजय पाटील यांनी सांगितले की, काम अतिशय गतीने सुरू आहे. अवघ्या ८ महिन्यात ६० टक्के काम झाले आहे. कामाचा दर्जाही अतिशय उच्च आहे. शांतिवन चिचोली आता खऱ्या अर्थाने आकारास येत आहे.
दीक्षाभूमी-ड्रॅगन पॅलेसचाही कायापालट
बुद्धिस्ट सर्किट अंतर्गत दीक्षाभूमी-ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली हे बौद्ध स्थळे एकमेकांशी जोडून पर्यटन वाढवण्याचा शासनाचा विचार आहे. या अंतर्गत पर्यटनासाठी शांतिवन चिचोलीला निधी मिळाला. सोबतच दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसचाही कायापालट होणार आहे. यासाठी शासनाने तब्बल १०० कोटी रुपये मंजूर केले आहे.