सावनेर : सावनेर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने दमदार विजय मिळविला आहे. तालुक्यात एकाही ग्रा.पं.मध्ये भाजपाला सरपंचपद मिळविता आले नाही. तालुक्यातील नांदोरी, जैतपूर आणि सोनपूर या तीन ग्रामपंचायतचे सरपंच पद राखीव होते. येथे संबंधित संवर्गातील एकही उमेदवार नसल्याने येथील सरपंच पद रिक्त आहे. या ग्रामपंचायतचा कारभार उपसरपंच याच्या हाती राहील. जटामखोरा ग्रामपंचायतीचे सर्वच सदस्य बिनविरोध निवडून आले होते. येथे सरपंचपदी सोनू रावसाहेब तर उपसरपंच पदी मंगला उईके यांची बिनविरोध निवड झाली. टेंभुरडोह ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्थित गटाचे सातही सदस्य विजयी झाले होते. येथे सरपंचपदी दीपक सहारे तर उपसरपंच पदी मोरेश्वर चवनारे यांची बिनविरोध निवड झाली. ९ सदस्यीय खुबाळा ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे ६ तर भाजपाचे ३ सदस्य विजयी झाले होते. येथे सरपंच पदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या अश्विनी ठाकरे यांना ६ तर भाजपच्या सुजाता गजभिये यांना ३ मते मिळाली. येथे ठाकरे विजयी झाल्या. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विजय कोरचे यांना ६ मते तर भाजपच्या शारदा शेंडे यांना ३ मते मिळाली. कोरचे विजयी झाले. नांदोरी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. येथे संबंधित संवर्गातील एकही सदस्य नसल्याने सरपंचपदाची निवडणूक झाली नाही.
येथे सातही सदस्य काँग्रेसचे असल्याने उपसरपंचपदी दीपक पिंगे यांची बिनविरोध निवड झाली. सोनपूर ग्रामपंचायतीचे सरपंच पद राखीव होते. या ग्रामपंचायतीमध्येही संबंधित संवर्गातील एकही उमेदवार नसल्याने सरपंच पद रिक्त राहिले. या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसकडे बहुमत आहे.
१७ सदस्यीय पाटणसावंगी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे १५ तर भाजपाचे २ सदस्य विजयी झाले आहे. येथे सरपंचपदी रोशनी ठाकरे तर उपसरपंचपदी दीपक दलाल बिनविरोध निवड झाली. जैतपूर ग्रामपंचायतीचे सरपंच पद राखीव होते. संबंधित संवर्गातील उमेदवार नसल्याने उपसरपंच पद रिक्त राहिले. येथे उपसरपंचपदी काँग्रेसच्या नेहा नाईक यांची बिनविरोध निवड झाली. ९ सदस्यीय सावंगी (हेटी) ग्रामपंचायतीमध्ये कॉँग्रेसचे ५, भाजपा २ तर दोन अपक्ष सदस्य विजयी झाले आहेत. सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अशोक डवरे यांना ५ मते तर भाजपचे रोशन कुथे यांना ३ मते मिळाली. डवरे दोन मतांनी विजयी झाले. उपसरपंचपदी शारदा माजरे बिनविरोध विजयी झाल्या.
७ सदस्यीय असलेल्या खुर्सापार ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी वंदना गोलाईत तर उपसरपंचपदी मंगेश जोगी यांची बिनविरोध निवड झाली. नरसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या ज्योती खोंडे उपसरपंचपदी प्रमोद घोडमारे विराजमान झाले. गडमी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लोकेश डोहाळे तर उपसरपंचपदी रत्नमाला काकडे यांची निवड करण्यात आली.
१७ सदस्यीय पोटा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पवन धुर्वे बिनविरोध विजयी झाले. मात्र उपसरपंच पदासाठी लढत झाली. तीत विश्वजीतसिंग सिंह विजयी झाले.