लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील ११० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. संयुक्त किसान मोर्चाने २६ मार्चला भारत बंदची हाक दिली होती. या आवाहनानुसार काँग्रेसने या बंदला पाठिंबा दर्शवित शुक्रवारी राज्यभरात ठिकठिकाणी ब्लाॅक स्तरावर लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनात आजी-माजी नगरसेवक, आमदार सहभागी झाले होते. केंद्रीय कृषी कायदे व सातत्याने वाढत असलेल्या महागाईचा यावेळी निषेध करण्यात आला.
नागपूर शहर काँग्रेस
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानुसार शुक्रवारी नागपुरात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शहरात ब्लॉकस्तरावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचे तीन काळे कायदे रद्द करा, पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर, महागाई नियंत्रणात आणा आणि कामगार कायद्यातील बदल रद्द करा अशी मागणी करण्यात आली. ब्लॉकस्तरावर आंदोलने झाली. यावेळी गिरीश पांडव, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, महासचिव डॉ. गजराज हटेवार, डॉ. मनोहर तांबुलकर,प्रा.बबनराव तायवाडे,उमेश शाहू,महेश श्रीवास,अण्णाजी राउत आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कोविडच्या नियमांचे पालन करीत हे आंदोलन करण्यात आले.
सावनेर- कळमेश्वर येथे चक्काजाम
- नागपूर ग्रामीण भागातही काँग्रेसतर्फे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सर्व तालुक्यात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दरम्यान
सावनेर व कळमेश्वर येथे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत रास्ता रोको करण्यात आला.
जो पर्यंत सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, केंद्राने केलेले काळे कायदे रद्द होणार नाही तोपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असे सुनील केदार यांनी जाहीर केले. यासोबतच सर्व तालुक्यात विविध ठिकाणी उपोषण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे, काँग्रेसचे नागपूर जिल्हा अध्यक्ष, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिती सभापती श्रावण भिंगारे, सुरेश भोयर, कुंदा राऊत, गंगाधर रेवतकर, दिलीप गुप्ता, भीमराव कडू, कैलाश राऊत, संजय ठाकरे, अवंतिका लेकुरवाळे, उपासराव भुते यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस ,सेवादल, इंटक, ठरवक ,अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्याकचे अध्यक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते.
किसान संघर्ष समन्वय समितीचा पाठिंबा
- नागपुरातील किसान संघर्ष समन्वय समितीने भारत बंदला पाठिंबा जाहीर केला. मात्र त्यांनी नागपुरात कोणतेही आंदोलन केले नाही. यादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असंघटित कामगार, शेतकरी, शेतमजूर यांची उपासमार होणार नाही, त्यांना गरजेपुरते धान्य व पैसा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने संयोजक अरुण वनकर व अरुण लाटकर यांनी केली आहे.