उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसची धावाधाव
By admin | Published: December 10, 2015 03:05 AM2015-12-10T03:05:28+5:302015-12-10T03:05:28+5:30
काँग्रेसचे विद्यमान आ. राजेंद्र मुळक यांनी लढण्यास नकार दिल्याने काँग्रेस नेत्यांना उमेदवार शोधण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले.
भाजपकडून व्यास, काँग्रेसकडून चव्हाण
नागपूर : काँग्रेसचे विद्यमान आ. राजेंद्र मुळक यांनी लढण्यास नकार दिल्याने काँग्रेस नेत्यांना उमेदवार शोधण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. एकाही माजी मंत्री किंवा दिग्गज नेत्याने लढण्याची तयारी दर्शविली नाही. दोन दिवसाच्या नागपूर मुक्कामात प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनीही उमेदवारांची चाचपणी केली. प्रमोद मानमोडे, गिरीश पांडव यांनीही नकार दिला. बुधवारी सकाळी नगरसेवक संजय महाकाळकर यांचे नाव समोर आले. मात्र, शेवटी माजी खा. विलास मुत्तेमवार यांच्या घरी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तीत माजी मंत्री नितीन राऊत, आ. सुनील केदार, अनंतराव घारड, नाना गावंडे, विकास ठाकरे उपस्थित होते.
बैठकीत ‘सक्षम’ उमेदवार म्हणून अशोकसिंग चव्हाण यांचे नाव निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे रविभवनात आयोजित पहिल्या बैठकीत अशोकसिंग चव्हाण यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. चव्हाण हे शहर कार्यकारिणीचे सदस्य आहेत. १९९८ पासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. सेवादलामध्येही त्यांनी काम केले आहे.
दुपारी २.३० च्या सुमारास भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले. भाजपचे गिरीश व्यास यांचा अर्ज दाखल करतेवेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, आशीष देशमुख, समीर मेघे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, यांच्यासह या तिकीटावर दावा करणारे महापौर प्रवीण दटके, रमेश मानकर हे देखील उपस्थित होते.
काँग्रेसचे उमेदवार अशोकसिंग चव्हाण यांच्यासोबत अर्ज दाखल करताना आ. सुनील केदार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, काँग्रेस नेते नाना गावंडे, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह आ. राजेंद्र मुळक हे देखील उपस्थित होते. (प्रतिनिधी)