लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरोगामी महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकरांमुळे आहे. परंतु मराठ्यांचे शाहू महाराज, ओबीसींचे महात्मा फुले आणि दलितांचे आंबेडकर असे गणित लावून या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात येत असून मराठा आरक्षण जाहीर केल्यामुळे मराठा व ओबीसींमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.समाज प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. वामन निंबाळकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या ‘वाहत्या जखमांचा प्रदेश : आकलन व समीक्षा’ आणि ‘चळवळीचे दिवस’ (अधुरं स्वकथन) या दोन पुस्तकांचे प्रकाशन दीक्षाभूमी येथील डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या कर्मवीर दादासाहेब ऊर्फ ना.ह. कुंभारे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या अॅड. सुलेखा कुंभारे, ललिता सबनीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, स्नेहलता निंबाळकर उपस्थित होत्या. डॉ. सबनीस म्हणाले, सध्याची स्थिती बिकट आहे. कर्मठ आंबेडकरी व लिबरल आंबेडकरी असे दोन गट निर्माण झाले आहेत. ते आपापल्या परीने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मांडणी करतात. वामन निंबाळकरांची सत्यवादी व औदार्याची आहे. ते संवेदनशील कवी होते. वाहत्या जखमांचा प्रदेश यातून त्यांना केवळ जखमा दाखवायच्या नाहीत तर त्या जखमांवर मलमपट्टी कोण करणार याचे चिंतन आहे. गिरीश गांधी म्हणाले, निंबाळकर यांच्या दलित पँथरच्या प्रवासापासूनचा मी साक्षीदार आहे. विचारवंतांनी समाजात मिसळू नये असे संकेत असताना हा विचारवंत सर्वात मिसळायचा. त्यांच्यासारख्या धडपडणाऱ्या व्यक्तीची आज गरज आहे. अॅड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, वामन निंबाळकर यांनी आपल्या लिखाणातून दलित चळवळीला पुढे नेण्याचे कार्य केले. त्यांनी समाजाकडून कोणतीही अपेक्षा केली नाही. निंबाळकर हे निसर्गाने घडविलेले कार्यकर्ते होते. प्रा. डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, दलित साहित्याचे कार्य सीमारेषांना ओलांडणारे असून या साहित्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवतेचा मापदंड निर्माण केला. चळवळीचे दिवस हे स्वकथन एका व्यक्तीच्या प्रगतीचे कथन नसून समाजाच्या भळभळत्या वेदना मांडण्याचे काम यातून झाले आहे. प्रास्ताविक स्नेहलता निंबाळकर यांनी केले. संचालन प्रा. डॉ. वीणा राऊत यांनी केले. आभार स्नेहलता खंडागळे यांनी मानले.