न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत विशेष तपास पथक गठित करावे; प्रशांत भूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 04:47 PM2018-02-24T16:47:25+5:302018-02-24T16:47:36+5:30
न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करावे, अशी मागणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. प्रशांत भूषण यांनी शनिवारी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणात दिल्लीतील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या फॉरेन्सिक मेडिसिन आणि विष विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आर के. शर्मा यांच्या मते लोया यांचा मृत्यू हृदय विकाराने झालेला नाही. सर्वोच्च न्यायालय सुद्धा या प्रकरणाला पाहिजे तसा न्याय देताना दिसत नाही त्यामुळे प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करावे, अशी मागणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. प्रशांत भूषण यांनी शनिवारी केली. टिळक पत्रकार भवन व नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिट द- प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते.
न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने झालेला नाही. सुरुवातील लोया यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यू बाबत शंका उपस्थित केली होती. नंतर दबावामुळे ते गप्प झाले. सरकारला वाटते हे प्रकरण न्यायालयात फेटाळले जावे. दबावामुळे सीबीआय या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास करू शकत नाही. त्यामुळे लोया यांचा मृत्यू कशाने झाला, याच्या तपासासाठी एसआयटी गठीत करण्याची गरज आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्यस्ती याचिका दाखल करणार असल्याची माहिती प्रशांत भूषण यांनी दिली.
आम आदमी पक्षात सुरु असलेल्या घडामोडी चांगल्या नाही. आपचे भवितव्य चांगले नाही. लोकांनी विश्वास ठेवून आम आदमी पक्षाच्या हाती दिल्लीत सत्ता दिली. परंतु मुख्यमंत्री के जरीवाल यांच्या कलाने हा पक्ष चालतो. या सरकारकडून लोकांचा भ्रमनिराश झाल्याचे त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
राफेल हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ला चौकीदार म्हणतात. पण त्यांच्या डोळयादेखत पंजाब नॅशनल बँके त ११,४०० कोटीचा घोटाळा क रणारा नीरव मोदी देशाबाहेर पळून गेला. एलआयसीतही असाच घोटाळा आहे. राफेल लढाऊ विमान खरेदीत २२ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. गेल्या ३० वर्षातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. बोफोर्स घोटाळा या तुलनेत काहीच नाही. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप नेत्यांनी लोकपाल नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर येताच भाजप नेत्यांना याचा विसर पडला आहे.. ५०० कोटीहून अधिक कर्ज दिलेल्यांची यादी जाहीर करावी. अशी मागणी प्रशांत भूषण यांनी यावेळी केली.
संविधान व लोकशाही धोक्यात
बँकातून जनतेचा पैसा काढला जातो. पण माहिती मिळत नाही. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी आपल्या मर्जीतील उर्जित पटेल यांना बसविण्यात आले. देशात जातीय दंगे, सांप्रदायिकता वाढली आहे. देशात आणीबाणीच्या काळापेक्षाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संविधान व लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात असल्याची टीका प्रशांत भूषण यांनी केली.