भारताचे संविधान बौद्ध तत्त्वज्ञानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:24 AM2017-09-23T01:24:37+5:302017-09-23T01:24:51+5:30
भारतीय संविधानाचे मूलतत्त्व हे बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आहेत. यामध्ये मानव-मानवात समानता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाचे सामंजस्य दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संविधानाचे मूलतत्त्व हे बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आहेत. यामध्ये मानव-मानवात समानता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाचे सामंजस्य दिसून येते. लोकशाहीची मुळे आपल्या देशात किती जुनी आणि खोलवर रुजलेली आहेत, हे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधान सभेच्या आपल्या शेवटच्या भाषणात सांगितले होते. यासंदर्भात त्यांनी तेव्हा बुद्धाच्या परंपरेचे उदाहरण दिले होते, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे व्यक्त केले.
मध्यभारतातील अप्रतिम शिल्पकृती, सरकारचे
१० कोटींचे अर्थसाहाय्य
कामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात सुमारे १० एकर परिसरात विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये ८३ फूट उंचीचा आकर्षक असा मुख्य पॅगोडा बांधण्यात आला आहे. या पॅगोडाच्या चारही बाजूला दहा फूट उंचीचे चार पॅगोडा तयार करण्यात आले आहेत. ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात मेडिटेशन सेंटर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने बांधण्यात आले आहे. राज्य शासनाने विपश्यना कें द्राच्या संकल्पनेची दखल घेऊन विपश्यना सेंटरसाठी १० कोटींचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले आहे. या सेंटरमध्ये विपश्यना साधना शिबिर घेण्यात येणार आहे.
मेट्रो रेल्वे कामठीपर्यंत जोडणार - गडकरी
दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस हे दोन जागतिक आकर्षणाचे केंद्र आहेत. आपल्या ध्येयाने प्रेरित राहून काम करणाºया सुलेखा कुंभारे यांनी विपश्यना केंद्राद्वारे आणखी एक जागतिक दर्जाचे स्मारक बनवले आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो रेल्वेला कामठीपर्यंत जोडले जावे, अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यावर विचार सुरू असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
बुद्धांचे शांतीचे विचार येथून जगभरात पोहोचतील- मुख्यमंत्री
राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांचा पहिलाच दौरा हा दीक्षाभूमीला भेट देण्याचा होता. दीक्षाभूमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यावर त्यांनी ड्रॅगन पॅलेसमध्ये बुद्धवंदना केली. देशाच्या सर्वोच्च पदावरील एखाद्या व्यक्तीने आपल्या कामाची सुरुवात संविधान निर्मात्याला अभिवादन करून करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विपश्यना हे कर्मकांड नाही. व्यक्तीला यातून आत्मबल मिळते. उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळते. तथागत गातम बुद्धांते शांतीचे विचार हे येथून जगभरात पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ध्यानसाधना व बुद्ध वंदना
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वप्रथम विपश्यना केंद्राचे लोकार्पण केल्यावर विपश्यना केंद्रातील बुद्ध मूर्तीला अभिवादन केले. त्यानंतर पाच मिनिटे ध्यानसाधना केली. ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली. यावेळीसुद्धा त्यांनी बुद्ध मूर्तीला अभिवादन केले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे लोकार्पण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. विपश्यना परिसरातील कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापिका सुलेखा कुंभारे उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, भगवान बुद्धाची शिकवण २५०० वर्षांपासून आपल्या देशाला प्रेरणा देत आहे. सम्राट अशोकपासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वच जण तथागत बुद्धांपासूनच प्रेरित झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात बुद्धाच्या परंपरेचे उदाहरण देताना सांगितले होते की, भारतात संसदीय परंपरा नवीन नाही. ती आधीपासूनच होती. लोकशाहीची ही प्रणाली बौद्ध भिक्खू संघाद्वारे व्यवहारात अवलंबली जात होती, असेही ते म्हणाले. यावेळी अॅड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, गोयनका गुरुजींच्या विपश्यनेमुळे मला प्रेरणा मिळाली. येथे सुद्धा एक विपश्यना केंद्र व्हावे, असे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्याय विभागाने मदत केली. आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. संचालन माधवी पांडे यांनी केले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आभार मानले.