स्वप्नांच्या घराला दरवाढीचा सुरूंग; हजार चौरस फुटांचे घर ५ लाखांनी महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 11:30 AM2022-04-15T11:30:02+5:302022-04-15T11:46:14+5:30
कोरोनानंतर घर स्वस्त मिळेल, असे सामान्यांचे स्वप्न आता स्वप्नच ठरणार आहे.
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : गेल्या तीन ते चार महिन्यांत सर्वच बांधकाम साहित्यांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. सध्या रेराकडे नोंदणीकृत जुन्या बांधकाम प्रकल्पांच्या किमती वाढणार नाहीत; पण नवीन प्रकल्पात सामान्यांना एक हजार चौरस फूट घरासाठी ५ लाख रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. कोरोनानंतर घर स्वस्त मिळेल, असे सामान्यांचे स्वप्न आता स्वप्नच ठरणार आहे.
एका प्रकल्पात जवळपास ४० टक्के सिमेंट व स्टील लागते. याशिवाय पीव्हीसी, एमएस पाईप व अन्य साहित्यांचा वापर होतो. दर दुपटीवर गेल्यामुळे बांधकामाचा खर्चही दुप्पट झाला आहे. याकरिता बिल्डर्सला बँकेकडून जास्त कर्ज घ्यावे लागेल, शिवाय व्याजही जास्त भरावे लागेल. त्यामुळे प्रकल्पात बिल्डर्सची गुंतवणूक दुप्पट झाली आहे. केंद्र सरकारने सिमेंट, स्टील असो वा अन्य बांधकाम साहित्यांच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्राधिकरणाची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. याकरिता बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.
स्टील ८० रुपये किलो
रशिया-युक्रेन युद्धाच्या आधी स्टीलची किंमत ५० रुपये किलो होती; पण युद्धाचे कारण पुढे करून कंपन्यांनी सर्व प्रकारच्या स्टीलची किंमत ८० रुपयांपर्यंत वाढविली. तसे पाहता युद्धाचा स्टील उत्पादनावर काहीही परिणाम होणार नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतरही भाव का वाढविले, हे कोडंच आहे. दुसरीकडे पीव्हीसी आणि एमएस पाइपचे दर दुप्पट झाले आहेत.
सिमेंटचे दर कार्टेलने वाढले
सिमेंट उत्पादनाची किंमत कमी असतानाही कंपन्यांनी कार्टेल करून दर वाढविले. यासंदर्भात दरावर नियंत्रण आणण्यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना कंपन्यांना ५५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. कंपन्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर हायकोर्टाच्या निर्णयावर ‘स्टे’ मिळाला. केंद्र सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे कंपन्या पुन्हा मनमानी पद्धतीने कार्टेल करून सिमेंटचे दर वाढवित आहेत.
रेती अन् गिट्टीचेही दर वाढले
राज्य शासनाने दोन वर्षे रेती घाटांचे लिलाव न केल्यामुळे अवैध पद्धतीने रेतीचे उत्खनन सुरू होते. त्यामुळे ८ ते १० हजार रुपयांत मिळणारे रेतीचे डोजर (४०० ते ५०० ब्रास) २५ हजारांवर गेले. आता लिलाव झाले आहेत. त्यानंतर वाढलेले दर कमी झालेले नाही. याशिवाय विटांवरील जीएसटीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ५ ते ६ रुपयांत मिळणारी वीट आता ८ ते ९ रुपयांत मिळत आहे.
५०० रुपये चौस फूट दर वाढणार
रेरामध्ये नोंदणीकृत नवीन बांधकाम प्रकल्पाचे दर जवळपास ५०० रुपये चौरस फूट वाढणार आहे. अर्थात एक हजार चौरस फुटांसाठी ग्राहकांना ५ लाख रुपये जास्त द्यावे लागतील. हा परिणाम बांधकाम साहित्यांचे दर दुप्पट झाल्यामुळे झाला आहे. त्यामुळे सामान्यांचे किफायत घराचे स्वप्न पूर्ण होणार नाही. केंद्र सरकारने प्राधिकरण स्थापन करून बांधकाम साहित्यांच्या किमतीवर नियंत्रण आणावे.
राजेंद्र आठवले, अध्यक्ष, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया.
बांधकाम साहित्य - चार महिन्यांपूर्वीचे दर - आताचे दर
स्टील - ४० रु. किलो - ८० रु. किलो
सिमेंट - २५० रुपये पोते - ३५० रुपये
रेती - ८ ते १० हजार डोजर - २५ हजार डोजर
विटा - ६ रुपये (एक) - ८.५० रुपये (एक)