लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात ग्राहक हिताचे आदेश जारी करून मुंबई येथील दि कंट्री क्लब इंडिया या कंपनीला दणका दिला आहे.तक्रारकर्त्या ग्राहकाकडून घेतलेले ८५ हजार रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावे, असा आदेश क्लबला देण्यात आला आहे. व्याज १७ जून २००८ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू होणार आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार अशी एकूण १५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम क्लबनेच द्यायची आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी क्लबला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला.डॉ. प्रवीण राठी असे ग्राहकाचे नाव असून, ते नागपूर येथील रहिवासी आहेत. कंपनीच्या प्रतिनिधींनी राठी यांची भेट घेऊन अमरावती रोडवर आधुनिक क्लब सुरू करणार असल्याचे सांगितले होते. या क्लबमध्ये हेल्थ क्लब, लॉन टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल, जीम, कोल्ड वॉटर जकोजी, रेस्टॉरेंट, स्नुकर टेबल, टेबल टेनिस, बार रुम, डान्स फ्लोअर, जॉगिंग ट्रॅक, बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स हॉल इत्यादी सुविधा राहणार आहेत. सिनेकलावंत, अधिकारी, न्यायमूर्ती, डॉक्टर्स, खेळाडू, व्यावसायिक आदी व्यक्ती क्लबचे सदस्य आहेत, अशी माहितीही राठी यांना देण्यात आली होती. राठी यांनी त्यावर विश्वास ठेवून १२ व १३ जून २००८ रोजी ८५ हजार रुपये सदस्यता शुल्क कंपनीकडे जमा केले. त्यानंतर त्यांनी सात वर्षापर्यंत क्लब सुरू होण्याची प्रतीक्षा केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. कंपनीने क्लब सुरू केला नाही. परिणामी, राठी यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली. त्यालाही उत्तर देण्यात आले नाही. शेवटी राठी यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर सादर करून तक्रारीतील सर्व आरोप फेटाळून लावले व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. परंतु, मंचने विविध बाबी लक्षात घेता ती तक्रार अंशत: मंजूर करून राठी यांना दिलासा दिला.अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंबनागपूर येथे क्लब सुरू करणे अशक्य होते तर, त्याची तक्रारकर्त्याला माहिती देऊन दिलगिरी व्यक्त करणे व तक्रारकर्त्याची रक्कम परत करणे आवश्यक होते. परंतु, कंपनीने तसे काहीच केले नाही. त्यामुळे कंपनीने सेवेत त्रुटी ठेवल्याचे व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे सिद्ध होते. करिता, तक्रारकर्ता शारीरिक-मानसिक त्रासाकरिता व तक्रारीच्या खर्चाची भरपाई मिळण्यास पात्र ठरतो असे निरीक्षण मंचने या निर्णयात नोंदवले.
ग्राहक मंच : ग्राहकाला फसविणाऱ्या दि कंट्री क्लब इंडियाला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 9:20 PM
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात ग्राहक हिताचे आदेश जारी करून मुंबई येथील दि कंट्री क्लब इंडिया या कंपनीला दणका दिला आहे.
ठळक मुद्दे८५ हजार रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश