नागपूर : विदर्भात पावसाचा जाेर कायम असून गुरुवारीही काेसळधारेने जनजीवन विस्कळीत झाले. नागपूर शहर आणि जिल्हा, चंद्रपूर तसेच गडचिराेली जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झाेडपून काढले. दरम्यान या पावसामुळे आलेल्या पुरात भंडारा येथील दोन आणि गडचिराेली येथील एक असे तिघे जण वाहून गेले. गडचिराेलीत सुदैवाने नाल्याच्या पुरात पुलाखाली पडलेल्या दुचाकीवरील एक जण बचावला. गाेंदियात बुधवारी पुरात वाहून गेलेल्या चाैघांचेही मृतदेह गुरुवारी सापडले. पुरामुळे विदर्भातील एसटी बसफेऱ्यांवर प्रभाव पडला आहे. अनेक मार्ग बंद असल्याने माेजक्याच बसफेऱ्या सुरू आहे. गडचिराेली जिल्ह्यात रेड अलर्ट कायम असून शनिवार, १६ जुलैपर्यंत शाळा - महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. साेबतच खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. विदर्भातील बहुतांश प्रकल्प हे फुल्ल झाले असून पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.
नागपूर शहरात गुरुवारी सकाळपासून पाऊस सुरू आहे. दुपारनंतर दमदार पाऊस बरसला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर-रस्त्यांवर पाणी साचले. नागपूर विभागातील ६० मंडळामध्ये अतिवृष्टीची नाेंद करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यात पाणी साचले होते. गुरुवारी पाणी कमी झाले. परंतु अजूनही काही ठिकाणी पाणी साचून आहे. वस्त्यांत व रस्त्यांवर जागोजागी चिखल पसरला आहे. यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाचे सात दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे इरई नदीला पूर आला आहे. रहेमतनगर, सिस्टर कॉलनी, हनुमान खिडकी, पठाणपुरा गेट, हवेली गार्डन आदी परिसरांत पुराचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची स्थितीही भयावह आहे. चंद्रपुरातील पूरबाधित ६७७ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. छोट्या नाल्यातील पाणी पुलावरून वाहत असल्याने गांगलवाडी-आवळगाव-मुडझा-व्याहाड मार्ग बंद झाला असून, येथील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. याशिवाय गोंडपिपरी-आष्टीसह अनेक मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दीड हजारांहून अधिक घरांची पडझड झाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर-कोलगाव वर्धा नदीवर मागील एका वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी अचानक वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने सहा मजूर तिथेच अडकले. गुरुवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्या सहा जणांना पुरातून बाहेर काढले.
वाहून गेलेल्या गोंदिया जिल्ह्यातील चारही जणांचे मृतदेह सापडले
गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवस झालेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तिरोडा आणि आमगाव तालुक्यातील तीन नाल्यांवरील पूल वाहून गेले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आठ ते दहा तास ठप्प झाली होती. मात्र, गुरुवारी (दि. १४) पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आल्याने या गावातील गावकऱ्यांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा मंदावल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पंधरा ते वीस मिनिटे पावसाने हजेरी लावली. दोन दिवस झालेल्या पावसामुळे १५६ घरे व गोठ्यांची पडझड झाली असून, नुकसानीचे सर्वेक्षण महसूल यंत्रणेकडून सुरू आहे. दरम्यान, वाहून गेलेल्या चारही तरुणांचे मृतदेह गुरुवारी आढळले.
भंडारा जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरल्याचे दिसत आहे. गत २४ तासात ३८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून केवळ भंडारा तालुक्यात ८९.५ मि.मी. पाऊस कोसळला असून अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ११८ टक्के पाऊस कोसळला आहे. मोहाडी तालुक्यातील विहिरगाव लगतच्या नाल्यात पडून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले. राजेश रामसंजीव पांडेय (४५) रा.हसारा असे मृताचे नाव आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे आजही उघडे असून २७ दरवाजे दीड मीटरने तर सहा दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे. येथून ९ हजार ७५० क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
गडचिराेली जिल्ह्यातील एटापल्ली परिसरात पुराच्या पाण्यातून दुचाकी वाहनासह पैलतीर गाठण्याच्या प्रयत्नात दोन युवक दुचाकीसह पुलावरून खाली पडले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याने पोहत काठावर येऊन आपला जीव वाचवला. अनिल मूलचंद आलाम (२८) असे मृत युवकाचे नाव असून, तो लगतच्या वासामुंडी येथील रहिवासी आहे. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. गडचिराेली जिल्ह्यात ११ ते १३ जुलैपर्यंत शाळांना सुटी देण्यात आली हाेती. त्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता १६ पर्यंत शाळा - महाविद्यालये बंद राहणार आहेत. साेबतच खासगी आस्थापना न उघडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गडचिराेली जिल्ह्यातील तीन हजारांवर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गडचिराेली जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली आहे.
एसटीच्या ३०० फेऱ्या रद्द
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागचे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला असून धोका लक्षात घेता, एसटी महामंडळाने नागपूर विभागाच्या विविध मार्गांवरील सुमारे २०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील एसटीची वाहतूक व्यवस्था कोलमडल्यासारखी झाली आहे.
पुढचे पाच दिवस अतिवृष्टी
ओडिसा व आसपासच्या क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. शिवाय उत्तर अरबी सुमद्र व गुजरातच्या किनारपट्टीवार सायक्लोनिक सर्क्युलेशन व कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढचे २४ तास ते वाढणार आहे. त्यामुळे १८ जुलैपर्यंत विदर्भात टप्प्याटप्प्याने अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.