लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत मागील काही दिवसांपासून भटके कुत्रे व डुकरांची संख्या वाढीस लागली असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकांच्या तक्रारींचा लवकर निपटारा व्हावा व नसबंदीच्या मोहिमेला गती देण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये एका ‘डॉग व्हॅन’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले आहेत.बुधवारी आरोग्य समितीची बैठक झाली. यावेळी उपसभापती नागेश सहारे, लीला हाथीबेड, सरिता कावरे, लहुकुमार बेहते, ममता सहारे, अपर आयुक्त राम जोशी, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. सरिता कामदार, डॉ. विजय जोशी, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, टाटा ट्रस्टचे अधिकारी डॉ. टिकेश बिसेन इत्यादी उपस्थित होते.बैठकीत प्रत्येक झोनमध्ये ‘डॉग व्हॅन’ देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सद्यस्थितीत दोन ‘व्हॅन’ व वेगळ्या आठ ‘व्हॅन’चा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे डॉ.महल्ले यांनी सांगितले. यावर कुकरेजा यांनी दोन ‘व्हॅन’ जुन्या झाल्या असल्याचे सांगत एकूण दहा ‘व्हॅन’चा प्रस्ताव सोपविण्यास सांगितले.२३९ पैकी १६१ नाल्यांची स्वच्छता ही ‘मॅन्युअल’ पद्धतीने केली जाते. यातील कमीत कमी १०० नाल्यांची स्वच्छता यंत्रांच्या मदतीने करण्याचे उद्दिष्ट या वर्षात निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी वेगळी बैठक बोलविण्याचे निर्देशदेखील दिले असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले.‘टाटा ट्रस्ट’च्या मदतीने २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. यातील १७ केंद्रांचा कायापालट झाला आहे. मनपा दवाखान्यातदेखील आता ‘बायोमॅट्रीक’ पद्धतीने उपस्थिती नोंदविण्यात येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.‘कलेक्शन’ केंद्र घटलेशहरात अगोदर कचऱ्याचे २७५ ‘कलेक्शन’ केंद्र होते. आता ही संख्या घटून १७० वर आली आहे. ‘ट्रान्सफर स्टेशन’ सुरू झाल्यानंतर याची संख्या आणखी कमी होऊन जाईल. शहरात असलेल्या तबेल्यांना स्थलांतरित करण्यासाठी नंदग्राम योजनेवर काम सुरू आहे. प्रत्येक बैठकीत या प्रकल्पाच्या प्रगतीची समीक्षा करण्यात येईल. ४ हजार ६०० पशुंना ठेवण्यासाठी ४६० शेड तयार करण्यात येतील. बहुतांश पशुपालकांनी विधानसभा क्षेत्राच्या आधारावर पशुंसाठी शेड तयार करण्याचा पर्याय दिला आहे, असे कुकरेजा यांनी सांगितले.कचरा उचलण्यासाठी द्यावे लागणार ६० हजारकचरा उचलण्यासाठी मनपा प्रशासन नागरिकांकडून ६० रुपये घेणार आहे. राज्य शासनाच्या दिशानिर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी उपयोगासाठी हे दर ६० रुपये राहतील तर व्यावसायिक उपयोग, लॉन, हॉटेल इत्यादींसाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. संंबंधित प्रस्ताव सभागृहात सादर करुन त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. येत्या दोन महिन्यात कचरा संकलनाची व्यवस्था मजबूत होईल. दोन ऑपरेटरच्या माध्यमातून शहरातील कचरा उचलण्यात येईल. ऑपरेटरच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, असे कुकरेजा यांनी सांगितले.
आणखी पाच स्मशानघाटांवर ‘ब्रिकेट’ मिळणारशहरातील १५ स्मशानघाटांपैकी अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कारासाठी ‘ब्रिकेट’ उपलब्ध आहेत. येत्या दिवसात मोक्षधाम, मानकापुर, सहकार नगर, गंगाबाई घाट, मानेवाड़ा घाट येथेदेखील ‘ब्रिकेट’ उपलब्ध करुन देण्यात येतील, असे बैठकीत ठरले.