नागपुरातील टपाल कार्यालयांमध्ये कोरोनाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 04:21 PM2020-09-05T16:21:25+5:302020-09-05T16:23:16+5:30
नागपूर शहरातील पोस्टाची सर्व कार्यालये कोरोनाच्या विळख्यात सापडली असून दोन कर्मचाऱ्यांचा आजाराने बळी घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील बहुतेक शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. यातून डाक विभागही सुटलेला नाही. शहरातील पोस्टाची सर्व कार्यालये कोरोनाच्या विळख्यात सापडली असून दोन कर्मचाऱ्यांचा आजाराने बळी घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून कर्मचाऱ्यांना सुविधा आणि सुरक्षेचे उपाय करण्याची मागणी केली जात आहे.
शहराच्या विविध झोनमध्ये असलेल्या टपाल कार्यालयांमध्ये ४० च्यावर कर्मचारी कोविड-१९ ने संक्रमित झाले आहेत. अयोध्यानगर पोस्ट आॅफिसमध्ये सर्वाधिक १९ कर्मचारी कोविड संक्रमित आढळून आले असून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. याशिवाय महात्मा फुले बाजार कार्यालयाचा एक कर्मचारी कोरोनाने दगावला आहे. सिव्हिल लाईन्सच्या जीपीओ कार्यालयात सर्वात आधी एक महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आली होती. विशेष म्हणजे तिचा अहवाल येईपर्यंत ती कार्यालयात उपस्थित होती. मात्र त्यानंतरही डाक विभागातर्फे थातूरमातूर उपाय करण्यात आले. आज या कार्यालयात ७ कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. चिंताजनक म्हणजे यामध्ये पोस्टमनचाही समावेश आहे. त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाय करण्यासह शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी पोस्टल कर्मचारी संघटनेचे (एनएपीई) सचिव धनंजय राऊत यांनी निवेदनातून सादर केली आहे.