कोरोना वाढला, सॅनिटायझरचा वापर घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:07 AM2021-03-16T04:07:43+5:302021-03-16T04:07:43+5:30
नागपूर : फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २ हजारांवर गेला. सरकार कोरोनाचे ...
नागपूर : फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २ हजारांवर गेला. सरकार कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात सॅनिटाईज करण्याच्या सूचना वारंवार करीत आले आहे. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी लोकांनी मास्क घालणे सुरू केले. पण, सॅनिटायझरचा वापर लोकांनी टाळल्याचेच दिसून येते. शहरातील मेडिकल दुकानदारांकडून सॅनिटायझरच्या विक्रीचा आढावा घेतला असता, ५० ते ६० टक्केच विक्री होत असल्याचे सांगण्यात आले.
मार्च महिन्यात कोरोनाचा रुग्ण शहरात आढळला. त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमध्ये शहरात कोरोनाच्या बाबतीत प्रचंड भीती निर्माण झाली होती. सुरुवातीच्या काळात लोकांनी नियमांचे पालन नियमित केले. सॅनिटायझरचा वापर घरोघरी व्हायला लागला होता. लोक बाहेर पडतानाही खिशात सॅनिटायझरची बाटली घेऊन पडायचे. बाहेरून कुणी आल्यावर त्याचे हात सॅनिटाईज केल्याशिवाय आत घेत नव्हते. तेव्हा सॅनिटायझरच्या किमतीही दुप्पट - तिप्पट होत्या. मेडिकल स्टोअर्स चालकांनी सॅनिटायझरच्या विक्रीतून त्या वेळी चांगलीच कमाई केली. पण, लॉकडाऊन हळूहळू मागे घेण्यात आला. कोरोनाचे रुग्णही कमी होत गेले. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, खाजगी - सरकारी कार्यालये सुरू झाली. प्रवासी सेवा सुरळीत झाल्या आणि लोकही मोठ्या संख्येने बाहेर पडायला लागले. त्यामुळे हळूहळू कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत गेले. आतातर लोक सॅनिटायझरचा वापर अतिशय कमी करीत आहेत. खाजगी - सरकारी कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने अथवा दुकानांतच सॅनिटायझर वापरासाठी ठेवण्यात आले आहे.
- लोकांमधील भीती कमी झाली
सुरुवातीला लोकांनी सॅनिटायझर महाग असतानाही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. फार्मसीमध्ये येणारा प्रत्येक जण किमान छोटी बॉटल तरी घेऊन जात होता. आता छोट्या बॉटलचा सेल फार कमी झाला. १ ते ५ लीटरच्या सॅनिटायझरच्या कॅन काही लोक घेऊन जातात तसेच व्यापारी प्रतिष्ठाने अथवा कार्यालयांमध्येच आता सॅनिटायझरची विक्री होत आहे. लोकांमध्ये भीती कमी झाल्याचे फार्मासिस्टचे म्हणणे आहे.
- काळजी घेतल्यानंतरही कोरोना झालाच
लॉकडाऊनच्या काळात आम्ही नियमांचे पालन केले. घराबाहेर पडताना सॅनिटायझरची बॉटल, मास्क वापरले. कार्यालयातही काम करताना एखाद्या वस्तूला हात लागल्यानंतर लगेत हात सॅनिटाईज करून घ्यायचो. इतकी काळजी घेतल्यानंतरही कोरोना झालाच. आता मास्क वापरतो. पण, सॅनिटायझरचा अति वापर करीत नाही.
- राजेश राऊत, नागरिक
- लुझमध्ये आता वापर कमी झाला आहे. ५ लीटरच्या कॅन लोक नेतात. लोकांनी काळजी घेणे टाळल्यामुळे विक्रीत घट झाली आहे. पूर्वी सॅनिटायझरच्या किमती वाढल्या असतानाही लोकांची मागणी जास्त होती. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, विक्री फार वाढलेली नाही. विशेष म्हणजे आता अनेक कंपन्यांचे सॅनिटायझर मार्केटमध्ये आहे. किमतीही कमी आहेत. मात्र, त्या प्रमाणात मागणी नाही.
- राजेंद्र कावडकर, अध्यक्ष, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन.